मेर्वी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच

0

रत्नागिरी : तालुक्यातील मेर्वी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. शेतातील पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका शेतकर्‍यावर झाडीत लपून बसलेल्या बिबट्याने हल्‍ला केला. यात शेतकर्‍याला दोन ते तीन ठिकाणी दुखापत झाली आहे. या शेतकर्‍यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेर्वी येथील शेतकरी पे्रमानंद कृष्णा आंब्रे (वय 40) हे सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  शेतातील पंप सुरू करायला गेले होते. शेताच्या बांधावरून चालत जात असताना झाडीत दडी मारून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून येत प्रेमानंद यांच्या डोक्यावर पंजा मारत झडप घेतली. प्रेमानंद यांनी बिबट्याचा प्रतिकार करत त्याच्याशी झुंज दिली. बिबट्याने पुन्हा त्यांच्या पाठीवर पंजा मारून जखमी केले. बिबट्याबरोबर झुंज देत त्यांनी त्याला दूर ढकलले. त्याचवेळी चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या पायावर जोरदार पंजा मारला. मात्र प्रेमानंद यांनी प्रतिकार सुरु ठेवल्याने, बिबट्या जवळच्या जंगलात पळून गेला. जखमी अवस्थेत प्रेमानंद आंब्रे शेतातून बाहेर आले वर घरी पोहोचले. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. बिबट्याने पुन्हा हल्‍ला केल्याचे वृत्त मेर्वीसह पंचक्रोशीत समजताच ग्रामस्थांनी प्रेमानंद यांना पाहण्यासाठी धाव घेतली. गेल्या चार महिन्यापासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यापूर्वी बारा ते तेरा जणांवर बिबट्याने हल्‍ला केला असून, मोटरसायकलस्वारांना लक्ष्य केले होते. परंतु शेतात जाणार्‍या शेतकर्‍यावर प्रथमच हल्‍ला केला आहे. त्यामुळे सकाळीच शेतात जाणार्‍या पंचक्रोशीतील शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावस, गणेशगुळे, मेर्वी परिसरात बारापेक्षा अधिक   ग्रामस्थांवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्यानंतरही वनविभाग बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरला आहे.काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी सहा जणांवर बिबट्याने हल्ला केला होता. यात गणेशगुळे सरपंच संदीप शिंदेही जखमी झाले होते. त्यानंतर वनविभागाने गावात बैठक घेतली होती व आम्ही नागपूरला सर्व माहितीचा प्रस्ताव पाठवला असून तिथून तो कोल्हापूरला येईल व त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी बोरिवली येथून एक पथक येईल, असे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले होते. परंतु वनविभागाकडून कोणत्याच हालचाली वेगाने सुरु नसून, सर्वच कारभार संथगतीने रेटला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here