नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटविण्यात आले. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर आजपासून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होत आहे. जम्मू – काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० संपुष्टात आणल्यानंतर त्याविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. कलम ३७० विषयी दाखल सर्व याचिकांवर पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ सुनावणी करेल, असे याआधी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते. त्यानुसार ही सुनावणी न्यायमूर्ती एन. व्ही. रमण, न्यायमूर्ती एस. के. कौल, न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या घटनापीठासमोर होत आहे. राष्ट्रहितासोबत कोणतीही तडजोड न करता जम्मू-काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने याआधी केंद्र आणि राज्य सरकारला दिले होते.
