रत्नागिरी तालुक्यात सरपंच निवडीत सेनेचे प्राबल्य

0

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक काल पार पडली. या २८ पैकी २१ सेना, ४ बीजेपी तर ३ गाव पॅनलचे सरपंच विराजमान झाले आहेत. दरम्यान, सरपंचपदाच्या निवडणुकीत रत्नागिरीत धक्कादायक प्रकार घडले आहेत. शिवसेनेच्या महत्वाच्या ग्रामपंचायती भाजपने खेचून घेतल्या असून अखेरच्याक्षणी शिवसेनेच्या सदस्यांनी दगाफटका दिल्याने महत्वाच्या ग्रामपंचायतींवर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. वाटदसह कासारी, मिया, नांदिवडे आदी ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. एखाद्याची हवा असली तर ती हवा रातोरात कशी निघून जाते याचा प्रत्यय रत्नागिरीकरांनी यापूर्वीदेखील घेतला आहे. असाच प्रत्यय ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत पहायला मिळाला. तालुक्यात बहुतांशी ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार हे निश्चित झाले होते. मात्र भाजपच्या हातून महत्वाच्या ग्रामपंचायती अवघ्या काही मतांनी गेल्या होत्या. त्यामुळे गेलेल्या ग्रामपंचायती ताब्यात कशा घ्यायच्या यासाठी भाजपने व्यूहरचना आखली होती. तालुक्यातील वरवडे ग्रामपंचायत ही वाटद जिल्हा परिषद गटातील लक्षवेधी ग्रामपंचायत ठरली होती. बोरकर विरूद्ध शिवसेना असा थेट सामना या ठिकाणी झाला. भाजपकडून ही ग्रामपंचायत लढवण्यात आली. मात्र सर्वात मोठा फटका भाजपला या ग्रामपंचायतीत बसला. सर्वच्यासर्व जागा शिवसेनेने मिळविल्या. त्यामुळे वरवडेचा पराभव जिल्हारी लागला
होता. वरवडे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले होते. काही नेत्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली होती. मात्र मतदारांनी शिवसेनेला पुन्हा एकदा कौल दिला आणि भाजपला दारूण पराभव स्वीकारावा लागला. वरवडेचा वचपा काढायचाच असा चंग बांधून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाटद ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या गडात थेट हात घातला आणि वरवडे ग्रामपंचायतीच्या पराभवाचा वचपा काढला. वाटद जिल्हा परिषद गट हा पूर्वापार शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र यावेळी चित्र फार वेगळे पहायला मिळाले. काही ग्रामपंचायती घासून आल्याने शिवसेनेत स्थानिक पातळीवर बदलाचे वारे वाहू लागले. त्यातच वाटद ग्रामपंचायतीमध्ये देखील काटावरचे बहुमत असताना भाजपने या ठिकाणी करिश्मा करून दाखविला. शिवसेनेचे दोन सदस्य भाजपने गळाला लावले आणि त्यांच्या मदतीने या ग्रामपंचायतीवर भाजपने कब्जा मिळविला आहे. सरपंचपदीअंजली विभुते तर उपसरपंचपदी सुप्रिया नलावडे या विराजमान झाल्या आहेत. असाच प्रकार कासारी ग्रामपंचायतीत घडला आहे. शिवसेनेला फाजील आत्मविश्वास घातक ठरला असून वाटद ग्रामपंचायतीपाठोपाठ कासारी ग्रामपंचायतदेखील शिवसेनेच्या हातून गेली आहे. कासारीमध्ये दर्शना बेनेरे सरपंचपदी तर संदेश महाकाळ उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. नांदिवडे ग्रामपंचायत ही सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या ग्रामपंचायतीत विवेक सुर्वे विरुद्ध शिवसेना असा थेट सामना झाला होता. मात्र सुर्वेनीअपक्ष उमेदवाराच्या मदतीने या ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळविले आहे. या ग्रामपंचायतीत आर्या गडदे सरपंचपदी तर विवेक सुर्वे उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. मिन्या ग्रामपंचायतीत अटीतटीची लढत झाली होती. या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे ५, भाजपचे ४ व २ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेचे ५ उमेदवार असतानादेखील अपक्ष उमेदवारांच्या मदतीने शिवसेना सरपंच बसवेल अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेतच सरपंच पदासाठी तू-तू मै-मै सुरू झाली. त्यामुळे उमेदवारी नेमकी द्यायची कोणाला असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरच्याक्षणी आकांक्षा निलेश कीर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपची कास पकडली आणि त्या थेट सरपंचपदी विराजमान झाल्या तर उपसरपंचपदी उषा कांबळे यांची निवड झाली आहे. महत्वाच्या ग्रामपंचायती शिवसेनेच्या हातून गेल्या आहेत. वाटद, कासारी, मिऱ्या, नांदिवडे आदी ग्रामपंचायतीत भाजपचे सरपंच बसल्याने शिवसेनेत नेमके घडले तरी काय? असा सवाल उपस्थित होत असून आता स्थानिक पातळीवर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:29 PM 10-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here