महायुतीच्या घोषणेनंतर अनेकांचे पत्ते कट झाल्याने दोन्ही पक्षांत नाराजी

0

मुंबई : भाजप-शिवसेना आणि घटक पक्षांची महायुती जाहीर झाली असली तरी जागांच्या अदलाबदली आणि विद्यमान आमदारांचे पत्ते कट झाल्याने दोन्ही पक्षांत नाराजी उफाळून आली आहे. कोथरुड मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणूक लढविणार असल्याने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट झाला आहे.  कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आल्याने भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार हे निवडणुकीतून बाहेर फेकले गेल्याने त्यांच्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करीत भाजप कार्यालयात नाराजी प्रकट केली. मात्र, दोन्ही आमदारांना चंद्रकांत पाटील यांनी पक्षापेक्षा कोणी मोठा नसल्याची समज दिली. महायुतीची घोषणा झाली तरी कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे घोषित करण्यात आले नाही. काही विद्यमान आमदारांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यातून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी प्रदेश कार्यालयात आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली. त्यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारीचा आग्रह धरला. आपण मतदारसंघात पक्ष वाढविल्याचे त्या सांगत होत्या. मात्र, हा पक्षाचा निर्णय आहे. पक्षापेक्षा कोणी मोठे नसल्याचे त्यांना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना नाराज होऊन परतावे लागले. चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीवरुन जातीय राजकारणही सुरु झाले असून ब्राम्हण महासंघाने उमेदवारीला विरोध केला आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघही शिवसेनेने प्रतिष्ठेचा केल्याने तो शिवसेनेला सोडण्यात आला. त्यामुळे नरेंद्र पवार समर्थकांनीही प्रदेश भाजप कार्यालयात चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आपली नाराजी प्रकट केली. तर, कल्याण पूर्व मतदारसंघात अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे भाजपकडून लढणार असल्याने तेथील शिवसैनिकांमध्येही नाराजीचे सूर उमटले. ठाण्याची जागा भाजपला मिळाली असली तरी शिवसेनेने दावा कायम ठेवला आहे. जागा भाजपकडे राहिली तरी तेथील भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांची उमेदवारी धोक्यात आहे. घटक पक्षाचे नेते शिवसंग्रामचेसर्वेसर्वा विनायक मेटे यांना बीडमधून उमेदवारी मिळविण्यात अपयश आले आहे. ही जागा शिवसेनेकडे गेली आहे.  तेथून जयदत्त क्षीरसागर हे निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे विनायक मेटेही नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे व्यक्त केली. बीडमधीलच केजच्या भाजप आमदार संगीता ठोंबरे यांचाही पत्ता कट झाला आहे. शिवसेनेतही सारेकाही आलबेल नाही. वडाळ्यातून विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांना भाजपचे तिकीट मिळाले आहे. तेथून श्रध्दा जाधव या शिवसेनेकडून इच्छुक होत्या. त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेत निवडणूक लढविण्याची घोषणा केली. वडाळा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आपण तो जिंकू असे त्या म्हणाल्या. आदित्य ठाकरे हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्या उमेदवारीची घोषणा उध्दव ठाकरे हे वरळीतील मेळाव्यात करणार होते. मात्र, युती झाल्याने अनेक इच्छुकांच्या निवडणूक लढविण्याचे स्वप्न भंगल्याने त्यांनी मातोश्रीबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे उध्दव ठाकरे हे या मेळाव्याला पोहचू शकले नाहीत. त्यांनी नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here