सोनवी पुलाचे काम पंधरा दिवसात होणार सुरू

0

संगमेश्वर : संगमेश्वरच्या दुतर्फा आरवली ते बावनदी या अतिअपघातप्रवण क्षेत्रातील काम ठप्प असल्याने वाहनचालकांनी चिंता व्यक्त केली आहे. संगमेश्वर येथे 1937 साली उभारलेल्या सोनवी पुलाला पर्याय म्हणून नवीन पुलाचे काम एबीसी या कंपनीमार्फत येत्या 15 दिवसांत सुरू होणार आहे.

आरवली ते बावनदीदरम्यान 12 छोटे मोठे पूल आहेत. वांद्रीजवळ सप्तलिंगी येथे सहा वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलांच्या कामांचा शुभारंभ झाला, मात्र शुभारंभानंतर वर्षभरातच या पुलासह अन्य पुलांची कामे सलग पाच वर्षे रखडली. सुस्त कंत्राटदार, पाठपुराव्याचा अभाव, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि सोशिक जनता यामुळे आरवली ते बावनदी या अती अपघातप्रवण क्षेत्रातील कामे प्राधान्याने होणे आवश्यक होते, मात्र ती कामे रखडली आहेत. ज्या क्षेत्रात आजवर सर्वाधिक अपघात झाले त्याच ठिकाणी कंत्राटदाराने अर्धवट स्थितीत कामे केली आहेत. त्यामुळे अपघात घडण्यास निमंत्रण देण्याची परिस्थिती निर्माण करून ठेवली. पाच वर्षांनंतर रखडलेल्या 12 पुलांची कामे मंदगतीने का होईना सुरू झाली. यामध्ये सप्तलिंगी, कोळंबे, शास्त्रीपूल, गडनदी पूल यांचा समावेश आहे. असे असले तरी, संगमेश्वर येथील प्रसिद्ध सोनवी पुलाला पर्याय काय ? हा प्रश्न संगमेश्वरवासीयांना नेहमीच पडत राहिला. सोनवी चौकाजवळ असणाऱ्या या पुलाबाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नव्हत्या. ब्रिटिश सरकारने 1937 साली उभारलेल्या या पुलाला 75 वर्षे पूर्ण होऊन गेली. सद्यस्थितीत हा पूल अवजड वाहने जाताना जोरात हलतो. दरम्यान पुलावरून जाणारे पादचारी जीव मुठीत धरून प्रवास करतात. परिणामी नवीन सोनवी पूलाचे काम कधी सुरु होणार ? असा प्रश्न संगमेश्वरवासीयांना कायम पडत आला . आता मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून येत्या 15 दिवसात नवीन सोनवी पूलाचे काम सुरू होणार आहे राष्ट्रीय महामार्गावर सप्तलिंगी , कोळंबे , शास्त्रीपूल येथील पूलांची कामे करणारी ए बी सी कंपनीच सोनवी पूलाचे काम करणार आहे . येत्या १५ दिवसांत या पूलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे . सोनवी पूलाच्या दुतर्फा असणारी अतिक्रमणे प्रथम हटविणे आता क्रमप्राप्त ठरणार असून येथे वाहतूक कोंडीचा देखील मोठा प्रश्न उभा रहाणार आहे . संगमेश्वर सोनवी चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीच उभा रहात असून आता नव्याने पूलाचे काम सुरु होणार असल्याने येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीसाची नियूक्ती करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे . दरम्यान कामाचा प्रारंभच न झालेल्या सोनवी पूलाला आता ७५ वर्षांनी पर्यायी पूल मिळणार असल्याने संगमेश्वरवासीयांसह वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:05 PM 10-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here