सतीश सावंत यांनी दिला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा

0

अपेक्षेप्रमाणेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेतील स्वाभिमानचे गटनेते सतीश सावंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे जिल्ह्यातील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्याच्या राजकारणातही सतीश सावंत यांच्या या भूमिकेवर सोमवारी जोरदार चर्चा सुरू होती. युती किंवा आघाडीचा निर्णय सोमवारीही जाहीर न झाल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करायला केवळ चार दिवस शिल्लक असतानाही संभ्रमाचे वातावरण कायम होते. माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांचा भाजप प्रवेश लांबला असल्याच्या बातम्या सोमवारीही टीव्ही चॅनेलवर झळकत होत्या. सोमवारचा दिवस उजाडला तो सतीश सावंत दुपारनंतर पत्रकार परिषद घेणार या बातमीने. सतीश सावंत हे स्वाभिमान पक्ष सोडून शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा गेले दोन-तीन महिने चालू होती. त्यातही गेले दहा ते पंधरा दिवस ते स्वाभिमान पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच होते. त्यामुळे ते लवकरच पक्षत्याग करणार या चर्चेने वेग घेतला होता. स्वाभिमान पक्षातील अनेक कार्यकर्ते एकमेकांना फोन लावून या बातमीची खातरजमा करत होते. त्यामुळे पत्रकार परिषदेत सतीश सावंत काहीतरी ब्रेकिंग न्यूज देणार या उत्सुकतेने मीडियाने त्यांच्या कलमठ येथील निवासस्थानी गर्दी केली होती. सोमवारी सायंकाळी 4.30 वा. ही पत्रकार परिषद  झाली. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीही यावेळी गर्दी केली होती. अखेर सतीश सावंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा त्याग करत असल्याचे जाहीर करत स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा.नारायण राणे यांना दिलेले पत्र आणि आपली पुढील भुमिका यासंबंधीच्या प्रसिध्दीपत्रकाच्या प्रती पत्रकारांना दिल्या. सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिल्याची बातमी पसरल्यानंतर जिल्हाभरातील राजकारणातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सतीश सावंत आता कुठल्या पक्षात जाणार याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तेत असलेल्या भाजप किंवा शिवसेना या पक्षामध्ये आपण प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे. आपण जोवर स्वाभिमान पक्षात कार्यरत होतो तोवर पक्षात राहून फोडाफोडी करणे आपणास पसंत नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ज्या पक्षात प्रवेश करावयाचा आहे त्या पक्षात जाताना जिल्ह्यातील स्वाभिमान पक्षातील कोणते कार्यकर्ते त्यांच्या सोबत जातात याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.वैभव नाईक यांनी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद आणि मालवण पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकणार असे म्हटले आहे. जानेवारी महिन्यात जि.प.अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींच्या निवडी होणार आहेत. त्यामुळे तत्पूर्वी जि.प.चे काही सदस्य आणि पं.स.चे काही सदस्य शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यातुनच सतीश सावंत यांच्या समवेत काही जि.प.सदस्य बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. सतीश सावंत यांनी पक्षाचा राजीनामा देताना स्वाभिमान पक्षाचे नेते आ.नितेश राणे यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोप सुरू राहण्याची शक्यता आहे. राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर ओरोस येथे सोमवारी स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठकही झाली. या बैठकीत प्रवेशाच्यावेळी जास्तीतजास्त कार्यकर्ते मुंबईला जाण्याबाबत चर्चा झाल्याची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय नेते व पदाधिकार्‍यांचे लक्ष युती होणार की नाही याकडे सोमवारी लागले होते. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख हे दोघेजण सोमवारी सायंकाळी युती जाहीर करतील अशी बातमी बाहेर आली होती. परंतु फडणवीस, ठाकरे यांची पत्रकार परिषद न होता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी युतीचा फॉर्म्युला निश्‍चित झाला असून युतीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित प्रसिध्दीपत्रक जारी करून करणार आहेत असे सांगितले. युती ठरली असेल तर तर ती जाहीर करण्यास इतका उशीर का? असा प्रश्‍न मिडियामध्ये उपस्थित केला जात होता. त्यातुनच युतीचे काही खरे नाही असाही सूर बाहेर पडत होता. युती अद्याप जाहीर न झाल्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील नेते अद्याप तरी एकत्र आलेले दिसत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर या पक्षातील नेत्यांचा वावर स्वतंत्रपणे सुरू आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली असली तरी भाजपाचे राजन तेली यांच्याकडून त्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरूच आहे. दोडामार्गमध्ये सोमवारी तेली यांनी काही कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. महाराष्ट्रात युती होईल अशी शक्यता असतानाही शिवसेना-भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते व पदाधिकार्‍यांचा वावर युती तुटणार अशाच स्थितीत दिसत आहे. सावंतवाडी आणि कुडाळ या दोन मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळे तिथे भाजपचे काही पदाधिकारी शिवसेनेला सहकार्य करणार नाहीत या भूमिकेत असल्याची चर्चा होती. सोमवारी ओरोस येथे भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेला सहकार्य न करण्याची भुमिका काही कार्यकर्त्यांनी मांडली. त्यानंतर भाजप पक्षाचा आदेश आला तरीदेखील आपण आदेश न मानता शिवसेनेला सहकार्य करणार नाही अशी भुमिका पत्रकार परिषद घेवून जाहीर केली. कणकवली विधानसभा मतदारसंघात सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ.प्रमोद जठार सोमवारी तातडीने मुंबईकडे रवाना झाले. त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईला बोलावणे धाडले अशी चर्चा जिल्ह्यात पसरली होती. त्यामुळे प्रमोद जठार यांना भाजपची उमेदवारी मिळू शकेल असा दावाही करण्यात येत होता. सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एम.के. गावडे यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती परंतु सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार आहे आणि आपल्याला उमेदवारी मिळणार आहे असे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही साळगांवकर यांच्या जाहीर भुमिकेनंतर चर्चेला ऊत आला आहे.आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत.  4 ऑक्टोबर पर्यंत शेवटची मुदत असल्यामुळे या चार दिवसात युती, आघाडीचा निर्णय होवून ते जाहीर होणे, राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा निर्णय होणे आणि इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची संधी मिळणे या सर्व गोष्टी उरलेल्या चार दिवसात घडणार असल्यामुळे या चार दिवसात मोठमोठ्या राजकीय उलथापालथ होणार यात शंका नाही. 

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here