मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या व्यंगचित्रामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट

0

मुंबई : शिवसेना – भाजपची युती जाहीर झाली असतानाच या युतीधर्मात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेकडून करण्यात आला आहे. भाजपला अत्यंत हिणकस वागणूक देणारे व्यंगचित्र शिवसेनेकडून ठिकठिकाणी प्रसारित करण्यात आल्यामुळे मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात भाजपचाच आमदार काम करीत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे युतीच्या जागावाटपात ज्या विधानसभा मतदारसंघांची अदलाबदल होणार आहे त्यात मागाठाणेचे नाव सर्वात वर होते. मागाठाणे भाजपकडेच जाणार असे म्हटले जात होते. आता विधानसभेसाठीही भाजप-शिवसेनेची युती पत्रकाद्वारे जाहीर झाली असली तरी जागावाटपाची घोषणा बाकी आहे. त्यामुळे मागाठाणेचाही फैसला युतीने जाहीर केलेला नाही. असे असताना ‘चल फूट माझ्या विभागातून… मागाठाणे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचाच’ अशी अर्वाच्य भाषा वापरणारे व्यंगचित्र शिवसेनेने सोमवारी मागाठाणेमध्ये पसरवले. शिवसैनिक भाजपच्या कार्यकर्त्याला लाथ मारत आहे, असे या व्यंगचित्रात दर्शवले आहे. हे व्यंगचित्र नजरेस पडताच मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. हा प्रकार थांबवा, त्यावर कारवाई करा अन्यथा विधानसभा निवडणुकीच्या मतदानातून या व्यंगचित्राचा जबाब देण्याची परवानगी आम्हाला द्या, अशी विनंती करणारे फोन भाजप नेत्यांना येऊ लागले. भाजपचे मंडल अध्यक्ष मोतीभाई देसाई यांनी या व्यंगचित्राबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. 

IMG-20220514-WA0009


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here