रत्नागिरी : गेले काही दिवस राष्ट्रवादीत जाणार, अशा चर्चेत असलेले जि. प.चे शिक्षण व अर्थ सभापती सहदेव बेटकर यांनी सोमवारी सायंकाळी जि.प. अध्यक्षांकडे आपल्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेला ऐन निवडणुकीच्या हंगामात ‘जय महाराष्ट्र’ केल्याने आता राष्ट्रवादीत त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात असून येत्या दोन दिवसांत हा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. संगमेश्वर तालुक्यातीत माखजन जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून निवडून आलेले सहदेव बेटकर यांच्यावर वर्षभरापूर्वी शिक्षण व अर्थ सभापती पदाची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर गुहागर मतदारसंघातही पक्षवाढीसाठी त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. गेले वर्षभर ते गुहागर मतदारसंघात पक्ष वाढीचे काम करीत होते. ते या मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुकही होते. मात्र, राष्ट्रवादीला रामराम करीत शिवसेनेत दाखल झालेल्या भास्कर जाधव यांना शिवसेनेने या मतदारसंघातून उमेदवारी दिली. यामुळे गेले काही दिवस बेटकर हे नाराज होते. यापूर्वी त्यांनी भाजपच्या पदाधिकार्यांची भेट घेतल्याची चर्चा होती. मात्र, तिथे गणित न जमल्याने गत आठवड्यापासून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांच्या संपर्कात होते. दोन दिवसापूर्वी ते चिपळुणात पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीलाही ते दिसले होते. यामुळे बेटकर हे राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती. जिल्हा परिषदेत विविध सभांमध्ये ते गैरहजर राहात होते. यामुळे ते नाराज होते, हे स्पष्टपणे दिसत होते. सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या विरोधातील अविश्वास ठरावासाठीच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर पार्टीमिटींगलाही ते दिसून आले. यामुळे बेटकरांचे बंड थंड झाले असे वाटत होते. परंतु सायंकाळी अध्यक्ष स्वरूपा साळवी यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे बेटकर यांचा आता राष्ट्रवादीचा प्रवेश निश्चित झाला आहे.येत्या दोन दिवसात हा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव विरूद्ध सहदेव बेटकर अशी लढत होणार असल्याची चिन्ह आहेत.
