चिपळूण : पावसाने उसंत घेतल्यानंतर महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला असून संबंधित ठेकेदार कंपनीने चौपदरीकरणास अडचण ठरणारी शहरातील बांधकामे पाडण्यास युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. शहरातील बहादूरशेख चौकापासून धडकपणे कारवाई सुरू झाली असून पाच जेसीबी, पोकलेन मशिनच्या सहाय्याने व शंभर कर्मचार्यांच्या फौजफाट्यासह ही धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम परशुराम ते खेरशेत दरम्यान चेतक कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे अधिकारी श्री. मांढरे व त्यांच्या कर्मचार्यांनी चौपदरीकरणाला अडसर ठरणारी बांधकामे पाडण्यास सोमवारपासून (दि.30) प्रारंभ केला आहे. बहादूरशेख चौकातील कोकणचा राजा गणेशोत्सव मंडळाची शेड, तसेच रस्त्याच्या दुतर्फा येणारी बांधकामे, हॉटेल साईशाची कंपाऊंड वॉल, सार्वजनिक बांधकाम विभागाचा संरक्षक कठडा, भागवत सर्व्हिसिंग सेंटरचा कठडा, रेडीज पेट्रोल पंप, वैभव हॉटेलशेजारील बांधकाम, मळ्यातील गणपती मंदिराजवळील कठडा व लादी, तसेच रस्त्याच्या दुतर्फा येणारे फलक व अन्य बांधकामे, छोट्या शेड, टपर्या अशा सर्वच बांधकामांवर बुलडोजर फिरविण्यात येत आहे. मोठ्या यंत्रणेसह सोमवारी सकाळी 10 वा. ही बांधकाम हटाव मोहीम सुरू झाली. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. मात्र, ज्या इमारती चौपदरीकरणाला अडथळा ठरत आहेत अशा काही इमारतींमधील नागरिकांनी अजूनही सदनिका खाली केलेल्या नाहीत. अशा इमारतींना ठराविक मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईत अशा इमारतींना वगळण्यात आले. बहादूरशेख नाक्यापासून सुरू झालेली ही मोहीम सुरुच होती. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन जाणार्या वाहतुकीला अडथळा येत होता. अनेकदा वाहतूक कोंडी झाली. चेतक कंपनीचे कर्मचारी हातात लाल निशाण घेऊन वाहतुकीचे नियंत्रण करीत होते. चार जेसीबी व पोकलेनच्या माध्यमातून ही धडक कारवाई संपूर्ण दिवसभर सुरू होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून संबंधित बांधकामे हटवली जाणार हे लक्षात घेऊन काही व्यावसायिकांनी महामार्गालगतचे गाळे, टपर्या आधीच रिकाम्या केल्या. मात्र, या कारवाईत अशी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे महामार्गावर ठिक़ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. या कारवाईला दुतर्फा असणार्या व्यावसायिकांनी सहकार्य केले. राम रेडीज, श्री. बापट, अशोक कदम, अमोल भोजने आदी व्यावसायिकांनी यावेळी संबंधित कंपनीला सहकार्य केले. या पुढील काळात राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू व्हावे व लवकरच पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
