मुंबई : बस आगारांचा वाहनतळासाठी वापर करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. यावर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने शिक्कामोर्तब केले. पण हा निर्णय अयोग्य असल्याची प्रतिक्रिया परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकार्यांमध्ये उमटत आहे. केवळ मुंबई महापालिका आयुक्तांच्या दबावापोटी हा निर्णय घेण्यात आला असून, त्याचा प्रत्यक्षात काहीच फायदा होणार नाही. उलट आगार असुरक्षित होणार असल्याची भीती अधिकार्यांनी व्यक्त केली. बेस्टच्या आगारात खासगी वाहनतळ उभारण्याचा निर्णय याअगोदर सुमारे 10 वर्षांपूर्वी बेस्टचे तत्कालीन महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांनी घेतला होता. सुरूवातीला ओशिवरा व गोरेगाव आगारात गाड्या उभ्या करून पुढे बेस्टच्या एसी बसने प्रवास करावा, अशी संकल्पना होती. पण याला फारसा प्रतिसाद लाभला नाही. पुन्हा एकदा पालिकेकडून आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे बेस्टने आगाराचे वाहनतळ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय नियोजनशून्य असल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे. आगाराची संकल्पना ही बस उभ्या राहण्यासह बसची दुरुस्ती, इंधन भरणे आदीसाठी करण्यात आली आहे. आगारात येणार्या प्रत्येक बसची तपासणी करण्यात येते, त्यामुळे आगार आजही सुरक्षित आहे. पण आता खासगी गाड्यांना प्रवेश देण्यात येणार असल्यामुळे आगारांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता अधिकार्यांनी व्यक्त केली. बेस्टच्या 26 आगारांत 3 हजार 500 बस उभ्या राहतील इतकीच जागा आहे. 10 वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात 4 हजारांहून जास्त बस होत्या. त्यावेळी बस कुठे उभी करायची असा प्रश्न भेडसावत होता. त्यामुळे यातील काही बस रस्त्यावर उभ्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या बेस्टच्या ताफ्यात 3 हजार 200 बस असल्या तरी, येणार्या काळात बसच्या संख्येत एक ते दीड हजाराने वाढ होणार आहे. त्यामुळे सध्याच्या आगारांची जागा कमी पडणार आहे याकडेही अधिकार्यांनी लक्ष वेधले आहे. मुंबईकरांना पुरेसे वाहनतळ उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. याचा अर्थ बेस्टच्या आगारांचे वाहनतळ करणे योग्य नाही. 24 तासांसाठी आगार वाहनतळासाठी देण्यात येणार असल्यामुळे बेस्टबस रस्त्यावर उभ्या करणार का, असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.
