रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी येथील दीप एंटरप्रायझेस दुकानानजिक कार आणि दुचाकीत धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वा. सुमारास घडली. अभिजित अनंत गराटे (३५,रा. कोतवडे, ता. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. राजाराम व्यंकप्पा पाटील (४९, रा.मिरजोळे, ता. रत्नागिरी) असे कारचालकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी ६.३० वा.सुमारास पाटील आपल्या ताब्यातील कार (एमएच-०४-डीआर-६०१६) घेऊन पाडावेवाडी ते एमआयडीसी असे गेले होते.७ वा.सुमारास ते जेएम कंपनी ते एक्सॉटिक कंपनी या अंतर्गत रस्त्याने घरी येत होते. त्याच सुमारास अभिजित गराटे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एएफ-०८१९) घेऊन येत होता. हे दोघेही दीप एंटरप्रायझेस जवळ आले असतात्यांच्यावाहनांमध्ये धडक होऊन अपघात झाला. यात अभिजित गंभीर जखमी झाल्याने राजाराम पाटील यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची कारवाई ग्रामीण पोलिस ठाण्यात सुरु होती.
