आचारसंहितेने वाचवला ‘अविश्‍वास’

0

रत्नागिरी : जिल्हा परिषदेमध्ये सध्या अधिकारी विरूद्ध पदाधिकारी व सदस्य असा संघर्ष चांगलाच रंगात आला आहे. सोमवारी अविश्‍वास ठरावाची सभा तांत्रिक कारण देत प्रशासनाने चक्क आयत्यावेळी रद्द केली. सेनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र आचारसंहितेचे कारण पुढे करत त्यांनीही नमते धोरण घेत सभा रद्द केली. आचारसंहितेमुळे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवरचा ‘अविश्‍वास’ वाचला आहे. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या विरोधात पदाधिकारी, सदस्य असा संघर्ष तीव्र झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी या हुकुमशाहीनुसार कारभार चालवतात असा आरोप करत त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणण्याची भूमिका सेनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी घेतली. त्यानुसार सोमवारी अविश्‍वास ठरावासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा होणार की नाही याबाबत सुरूवातीपासूनच संभ्रमावस्था होती. प्रशासनाने तांत्रिक मुद्याचं कारण देत ही सभा चक्क रद्द केली. ही सभा रद्द झाल्याचे फक्त जि.प.अध्यक्षा स्वरुपा साळवी यांना काहीतास अगोदर कळविण्यात आले. एकाही जि.प.सदस्याला रद्द झालेल्या सभेबाबत काहीच कळवण्यात आले नव्हते. त्यामुळे सकाळी शिवसेनेचे सर्व सदस्य जि.प.भवनात दाखल झाले. तत्पूर्वी अध्यक्षांच्या दालनात सेनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची याबाबत बैठक झाली. त्यानंतर ठरल्यानुसार सर्व सदस्य हे सभागृहात दाखल झाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमोडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी या बैठकीबाबत पत्र देत ही सभा घेवू नये असे सांगितल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पत्राचे यावेळी वाचन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल या आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीत ज्या रकमा जप्त करण्यात येतात त्याबाबत निर्णय घेण्याच्या वैधानिक समितीप्रमुखपदी करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावर अविश्‍वास ठराव टाकणे आचारसंहिता भंगाचा विषय होवू शकतो. त्याचबरोबर विशेष सभेमुळे मतदानावर प्रभाव पडू शकतो, असे या पत्रात म्हटलं आहे. या सर्व विषयावर उदय बने, बाबू म्हाप, संतोष थेराडे, रचना महाडिक, दीपक नागले या सदस्यांनी आक्षेप घेत मूळात हे पत्रच आपल्याला मिळाले नसल्याचे सांगितले. आचारसंहिता भंग होणार असेल तर सभा रद्द केलीत तरी चालेल, याला आमचा विरोध नाही. परंतु कोणतीही कल्पना न देता अशी सभा रद्द करता येत नाही. हा सभागृहाचा अवमान असल्याचे यावेळी सांगितले. त्याचबरोबर जि.प.भवनात लावण्यात आलेल्या बोर्डावरही आक्षेप घेतला. या बोर्डावर ही सभा तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले आहे असे म्हटले होते. मुळात हा बोर्ड लावता येतो की नाही याबाबतही प्रशासनाला विचारलं. मात्र याचं काहीच उत्तर आलं नाही. त्याचबरोबर सदस्यांच्या म्हणण्यानुसार या सभेचं इतिवृत्त होणे गरजेचे होते मात्र तसे केले गेले नाही. यावर सर्व सदस्य आक्रमक झाले होते. गेले काही दिवस शिक्षण व अर्थ सभापती सहदेव बेटकर हे विविध सभांना गैरहजर दिसतात. सध्या ते राष्ट्रवादीच्या वाट्यावर असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे त्यांची गैरहजेरी प्रत्येक वेळी दिसण्यात येत होती. मात्र सोमवारी अचानक ते जि.प.भवनात आले. त्याचबरोबर पार्टी मिटींगला ते बसले. मात्र सायंकाळी त्यांनी आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here