कोकणात युती मजबूत

0

कोकणात एकनाथ शिंदे, भास्कर जाधव, राजन साळवी, उदय सामंत, किसन कथोरे, हितेंद्र ठाकूर, विष्णू सावरा, रवींद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर यांनी गेल्या काही वर्षांत आपले स्वत:चे बालेकिल्ले तयार केले आहेत. या नेत्यांनी यापूर्वीच्या सलग दोन ते चार निवडणुका जिंकत आपला मतदार संघावरील प्रभाव मजबूत केला आहे. मागील निवडणुकीत नारायण राणे यांचा मालवणचा गड कोसळला. तर चिपळूणमध्ये गोविंदराव निकम यांचे चिरंजीव शेखर निकम यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, अनेक वर्षांचे बालेकिल्ले कायम राखण्यासाठी आता पुन्हा एकदा नेत्यांची दमछाक सुरू होणार आहे. नारायण राणेंना कणकवलीत नितेश राणेंचा विजय हवा आहे. तर गमावलेला मालवणचा किल्ला त्यांना जिंकायचा आहे. मात्र, अनेक समर्थक सोडून जात असल्याने आणि भाजप प्रवेशाचे ठरत नसल्याने राणेंच्या समोर चिंता वाढल्या आहेत. आता राणेंच्या वाटचालीकडे कोकणचे लक्ष आहे. डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याचबरोबर पालघर आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या भागावरही त्यांनी प्रभाव निर्माण केला. त्यामुळे भाजप संघटनेवरही त्यांची पकड आहे. हे भाजपसाठी सकारात्मक ठरणारे आहे. यावेळच्या निवडणुकीत पक्षांतरामुळे अनेक मतदार संघांची समीकरणे बदलली आहेत. नारायण राणे यांनी शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसही सोडली. भाजपने त्यांना प्रवेश दिला नाही. त्यामुळे त्यांच्या कणकवली येथील जागेवर काय करणार? कुठल्या पक्षातून नितेश राणे लढणार, याचा निर्णय झाला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आता चार दिवस बाकी आहेत. शिवसेनेने कोकणातील विद्यमान आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण, भरत गोगावले या विद्यमान आमदारांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे. भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला, त्यांना गुहागरमध्ये उमेदवारी मिळाली आहे. तर रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना दापोलीत शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे कर्जतचे आमदार सुरेश लाड शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, शिवसेनेने या मतदार संघात महेंद्र थोरवे यांना एबी फॉर्म दिल्याने या चर्चांना विराम मिळाला आहे. श्रीवर्धनच्या आपल्या मजबूत गडावर सुनील तटकरे हे त्यांची कन्या आदिती तटकरे यांना उभी करणार आहेत. त्या सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. नव्या वारसदारांची लढाई सिंधुदुर्गात, कणकवलीत नितेश राणे, रत्नागिरीमध्ये दापोलीत योगेश कदम, रायगडमध्ये श्रीवर्धनमधून आदिती तटकरे आणि पालघरमध्ये नालासोपार्‍यात हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर आणि विक्रमगडमध्ये विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा हे रिंगणात उतरणार आहेत. या नव्या वारसदारांच्या लढती औत्सुक्यपूर्ण असतील. वजनदार नेत्यांमध्ये सावंतवाडीत शिवसेनेकडून दीपक केसरकर, गुहागरमध्ये भास्कर जाधव, ठाणे कोपरीमध्ये एकनाथ शिंदे, वसईमध्ये हितेंद्र ठाकूर अशाही काही महत्त्वाच्या लढती कोकणात होणार आहेत. युतीची घोषणा झाल्यामुळे भाजपला रत्नागिरीमध्ये एकही जागा मिळालेली नाही. सिंधुदुर्गात कणकवलीच्या जागेवर राणेंचा प्रवेश रखडल्यामुळे उमेदवार कोण? याचा निर्णय अधांतरीत आहे. त्यामुळे येते दोन दिवस उमेदवारांसाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत. यानंतर सर्व मतदार संघांचे चित्र स्पष्ट होईल. नालासोपार्‍यातून शिवसेनेने प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले विजय पाटील हे वसईतून शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर या दोघांनाही आता शिवसेनेशी दोन हात करावे लागणार आहेत. शिवसेनेने सिंधुदुर्गात दोन, रत्नागिरीमध्ये पाच, रायगडमध्ये चार जागा, ठाण्यात नऊ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पालघरमध्ये शिवसेना चार जागा लढवणार आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपकडून अधिक जागा मिळवल्याचे चित्र पुढे येत आहे. अखंड कोकणच्या एकूण एकोणचाळीस जागांमधील जवळपास चोवीस जागा शिवसेना लढवणार आहे, तर उर्वरित जागा भाजप लढवणार आहे. त्यामुळे 2014 पेक्षा कोकणात शिवसेना अधिक जागा मिळवण्याची शक्यता आहे. मात्र, राणे आणि शेकापसाठी ही विधानसभा कसोटीची ठरणार आहे. राणेंना भाजपने प्रवेश दिला नाही, तर नितेश राणे यांना स्वाभिमान पक्ष हा एकमेव पर्याय राहणार असून, राणेंविरोधात विरोधक एकवटण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कोकणात भुईसपाट झाल्याचे चित्र असून, रायगड वगळता आघाडीच्या हाती काही लागण्याची चिन्हे कमी आहेत. मात्र, ठाण्यात जितेंद्र आव्हाड आपला गड राखू शकतात. शिवसेनेचे वजनदार नेते एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेच्या गळाला लावल्याने राष्ट्रवादीचा हा गड कोसळला आहे. दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीच्या उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपमध्ये जाण्याची तयारी केल्याने राष्ट्रवादीची येथेही पीछेहाट झाली आहे. त्यामुळे ठाण्यातही आघाडी कमजोर झाली आहे. रत्नागिरीत भास्कर जाधव, सिंधुदुर्गात नारायण राणे यांनीही आघाडीची साथ सोडली आहे. हे धक्के घेऊनच आघाडी रिंगणात उतरणार आहे. काही अपवाद वगळता आघाडीची पराभूत मानसिकता आणि युतीचे वाढलेले मनोधैर्य अशा वातावरणात कोकणात विधानसभेची निवडणूक रंगेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here