लांजा : लांजा तालुक्यातील पालू,चिंचुर्टी गावामध्ये गेली पंधरा दिवस बिबट्याने धुमाकुळ घातला असून बिबट्याने गावातील आठ ते दहा कुत्र्यांना ठार केले आहे. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे पालू व चिंचुर्टी गावामध्ये भितीचे वातावरण पसरले असून वनविभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. आपल्या अन्नाच्या शोधार्थ वन्य प्राणी लोकवस्तीकडे फिरकू लागले आहेत. तालुक्यातील पालू व चिंचुर्टी गावामध्ये बिबट्याने लोकवस्तीत घुसुन उच्छाद मांडला आहे. बिबट्या गेली पंधरा दिवस रात्री-अपरात्री लोकवस्तीत बिनधास्त वावरताना नागरीकांच्या नजरेस पडत आहे. बिबट्या राजरोसपणे वस्तीत शिरुन भटक्या कुत्र्यांना भक्ष करत आहे. गेली पंधरा दिवसात बिबट्याने दहा कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. पालू, चिंचुर्टी परिसर हा डोंगराळ आणि जंगलमय भाग आहे. त्यामुळे बिबट्याची दहशत सुरू असल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला वर्ग व शेतकरी शेतात जाण्यास धजावत आहेत. वेळीच दहशत माजविणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालू व चिंचुर्टी येथील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
