रत्नागिरी : मिरकरवाडा मत्स्य बंदराच्या विकासासाठी टप्पा दोन अंतर्गत 74 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यापैकी निम्मा निधी मिरकरवाडा समुद्रात बे्रक वॉटर वॉल उभारण्यातच खर्ची टाकण्यात आला आहे. बंदरावर मच्छीमारांच्या सोयी-सुविधांसाठी 16 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. ही कामे बाजूला ठेवून ब्रेक वॉटर वॉल बांधण्याला प्राधान्य देण्यात आले. स्थापत्य कामे तशीच पाडून ठेवण्यात आल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी आहे. अशातच बंदर विकासाचा प्रस्ताव वाढून शंभर कोटींवर पोहोचला आहे. ठेकेदाराने आतापयर्र्ंत केलेल्या कामाइतकेही बिल आदा न झाल्याने उर्वरित कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील नंबर एकचे व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरकरवाडा बंदरात गाळाची समस्या दरवर्षीचे दुखणे होते. त्यामुळे येथील मत्स्य व्यवसायावर परिणाम होत असे. या गाळामुळे बोटीची वाहतूक आणि बोटी धक्क्यावर उभ्या कराव्या लागत होत्या. यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी मच्छिमार करत होते. मिरकरवाडा बंदर विकासासाठी मेरीटाईम बोर्डाकडून 74 कोटी 69 लाख 67 हजाराचां प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याला शासनाने मान्यताही दिली. या प्रस्तावानुसार बंदरातील गाळ काढणे आणि मातीचा भराव टाकणे यासाठी 7 कोटी 27 लाखांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी 6 कोटी 3 लाख 21 हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. पश्चिमेकडील अस्तित्वात असलेल्या बे्रकवॉटर वॉलची लांबी वाढवणे आणि उत्तरेकडील बे्रकवॉटर वॉल बांधणे यासाठी 41 कोटी 34 लाख 3 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात यासाठी 51 कोटी 36 लाख 79 हजार रुपये निधी खर्च झाला आहे. वाढीव खर्चाच्या अंदाजपत्रकाला शासनाने मंजुरी दिली आहे. बंदर विकास अंतर्गत सध्या ही दोनच कामे करण्यात आली असून प्रस्तावातील उर्वरित 16 कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. यामध्ये रिवेंटमेंट तयार करणे, स्लोपिंग हार्ड व स्लोपिंग रॅम्प बांधणे, अंतर्गत रस्ते बांधणे, ऑक्शन हॉल, प्रशासकीय इमारत, गिअर शेड, जाळे विण्यासाठी शेड, विश्रामगृह, रेस्टॉरंट, फिश मर्चंट डॉर्मिटरी रेडिओ कॅम्युनिकेशन सेंटर, प्रसाधनगृह, गार्ड हाऊस, कंपांऊंड वॉल, पाणी पुरवठा व विद्युतीकरण व पंपहाऊस व वेस्ट वॉटर ट्रिटमेंट सिस्टिम, कार्यशाळा तसेच आकस्मिक खर्च यांचा समावेश आहे. ठेकेदाराने प्राप्त निधीपेक्षाही अधिकचा खर्च केला आहे.
