रत्नागिरी : रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी सुशांत चवंडे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी जाहीर केल्यानंतर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी पडली आहे. माजी आमदार बाळ माने यांच्या उपस्थितीत तालुक्यातील नाराज पदाधिकार्यांनी जिल्हा कार्यालयात बैठक घेऊन, पुढील आठ-दहा दिवसांत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माजी सरचिटणीस दादा दळी यांना तालुकाध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पक्षवाढीच्या दृष्टीने अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. हे बदल जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना रुचेनासे झाले आहेत. सुशांत चवंडे यांची काही दिवसापूर्वी प्रभारी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र मंगळवारी जिल्हाध्यक्षांनी त्यांची पुढील तीन वर्षासाठी तालुकाध्यक्ष म्हणून चवंडे यांची निवड जाहीर केली. याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी माजी आमदार बाळ माने यांनी भाजप जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला माजी तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष नाना शिंदे, माजी तालुका सरचिटणीस दादा दळी या प्रमुख पदाधिकार्यांसह सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते. तीन वर्षापूर्वी सतीश शेवडे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करताना दादा दळी यांनी तालुकाध्यक्षपदासाठी दावेदारी दाखल केली होती. त्यावेळी सतीश शेवडे हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते, त्याचा फायदा पक्षाला होईल म्हणून त्यांना तालुकाध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दादा दळी यांना सरचिटणीस पदावर समाधान मानावे लागले होते. मात्र चवंडे यांच्या निवडीमुळे आता नाराजी उफाळून आली आहे. उपस्थित कार्यकर्त्यांनी येत्या आठ दिवसात तालुक्यातील दोन हजार कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करुन, यावेळी दादा दळी यांना तालुकाध्यक्ष म्हणून जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या दौर्यावेळीही भाजपच्या काही प्रमुख माजी पदाधिकार्यांना डावलण्यात आल्याची चर्चा यावेळी बैठकीत करण्यात आली.जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा यशस्वी केल्यामुळे काहीजण त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चाही भाजप वर्तुळात सुरु आहे.
