राजकीय घडामोडींना वेग..

0

सिंधुदुग : सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे गटनेते सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाचा त्याग केल्यानंतर मंगळवारी त्यांची शिवसेना आणि भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी कलमठ येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली आणि पाठिंबाही दर्शविला. त्यामुळे सतीश सावंत यांना सत्तेतील या दोन्ही पक्षांकडून पाठिंबा मिळत असल्यामुळे ते नेमके कोणत्या पक्षात जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील नेते व पदाधिकार्‍यांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी दत्ता सामंत यांनी मालवणात बैठक बोलावून शक्तीप्रदर्शन केले. दत्ता सामंत हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला असून आ.नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी मिळणार, अशी जोरदार चर्चा पुन्हा एकदा मंगळवारी राजकीय वर्तुळात सुरू होती. माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांची मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पुन्हा चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपमध्ये प्रवेश निश्‍चित झाल्याची चर्चा होती. दरम्यान, आ. नितेश राणे यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे मंगळवारी मुंबईत दिला. त्यामुळे राणे यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाल्याचे मानण्यात येत आहे. आ. राणे हे 2014 साली काँग्रेस पक्षातून निवडून आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ.प्रमोद जठार यांच्याकडे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी एबी फॉर्म दिला असून त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार तो फॉर्म कुणाला द्यायचा याचा निर्णय बुधवारी होवू शकेल, असे सांगण्यात येत होते. कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी कुणाला मिळणार याची जोरदार चर्चा मंगळवारी सुरू होती. ही जागा युती झाल्याने भाजपच्या वाट्याला गेली आहे. अतुल रावराणे आणि संदेश पारकर हे या मतदारसंघातून भाजपकडून पूर्वीपासून इच्छूक आहेत. त्यातही राणे यांचा भाजप प्रवेश झाला तर या मतदारसंघातून विद्यमान आमदार नितेश राणे यांना उमेदवारी मिळणार हे निश्‍चित आहे. असे घडले नाही तर स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिलेले सतीश सावंत यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात सुरू होती. सतीश सावंत यांच्या निवासस्थानी भेट घेणार्‍यांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेते आणि पदाधिकार्‍यांचा समावेश होता. त्यात शिवसेनेचे आ.वैभव नाईक यांनी जाहिररित्या सतीश सावंत यांच्या पाठीशी आम्ही आहोत, असे सांगितल्याने शिवसेनेकडून सतीश सावंत यांना प्रवेश देण्यासंबंधी दोन पावले पुढे पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी सतीश सावंत यांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांच्यासोबत कोण कोण जातील, याची चर्चाही जिल्ह्यात सुरू होती. जिल्ह्यातील आणखी काही पदाधिकारी शिवसेनेत जातील का? याचीही चाचपणी चर्चेतून सुरू होती. आ.नितेश राणे यांना कणकवलीतून भाजपची उमेदवारी मिळाली तर इतर दोन मतदारसंघात युतीचा धर्म पाळून स्वाभिमानचे कार्यकर्ते शिवसेनेला मदत करतील का? अशी चर्चा सुरू असतानाच कुडाळ-मालवण मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आहे. दत्ता सामंत यांनी यासाठी मालवणात कार्यकर्त्यांची मिटींग घेतली. या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आतापर्यंत आ.वैभव नाईक यांच्या विरोधी गोटात पूर्णपणे शांतता होती. दत्ता सामंत यांनी या मतदारसंघात उतरण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे या मतदारसंघातील लढतीमध्ये आता रंगत आली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी सुरू केली असून ते पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. याच मतदारसंघात युतीचे उमेदवार म्हणून पालकमंत्री दीपक केसरकर हे मानले जात असले तरीदेखील भाजपचे स्थानिक नेते माजी आ.राजन तेली यांनी या मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी सुरूच ठेवली आहे. युती झाली तरीदेखील तेली अपक्ष  उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत अशी माहिती हाती आली आहे.  स्वाभिमान पक्षाच्या कुणीही उमेदवाराने या मतदारसंघात अद्याप उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत जाहीर केलेले नाही. शिवसेना, भाजपची जी उमेदवारी यादी जाहीर झाली त्यामध्ये भाजपचे नेते शालेय शिक्षण मंत्री सिंधुदुर्ग सुपूत्र विनोद तावडे यांचे नाव नव्हते. त्यामुळे तावडे यांच्या गोटात खळबळ उडाली होती. मात्र सिंधुदुर्ग सुपूत्र मंत्री आशिष शेलार यांचे नाव पहिल्या यादीत आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही भाजपची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. सिंधुदुर्ग सुपूत्र सुनील प्रभू यांना शिवसेनेने मुंबईत दिंडोशी मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. या दोन्ही पक्षांच्या याद्यांमध्ये सिंधुदुर्ग सुपूत्रांचा समावेश आहे. काँग्रेसने नाटळचे सुपूत्र डी.पी.सावंत यांना नांदेड भागात विधानसभेची उमेदवारी दिली आहे. भिरवंडेचे सुपूत्र विक्रम सावंत यांनाही सांगली-जत मधून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या पक्षांच्या याद्यांकडे सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले असून अजुनही नावे जाहीर व्हायची आहेत. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्यामुळे जे काही निर्णय घ्यावयाचे असतील ते बुधवारी 2 ऑक्टोबरला घ्यावे लागतील. कारण त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तातडीने पार पाडावी लागेल. त्यामुळे बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जाहीर होईल हे निश्‍चित आहे. त्याबरोबरच या दोन्ही पक्षांचे उमेदवारही जाहीर होतील. राणे यांचा भाजप  प्रवेशाबाबतचा निर्णयही बुधवारी अपेक्षीत आहे. आणि त्यानंतर आपसुकच बर्‍याच अंशी जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here