ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांचा अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश

0

सावंतवाडी : शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी अखेरीस दिल्‍ली येथे एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्‍लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत पक्षात स्वागत केले. दिल्‍ली येथे आयोजित एका कार्यक्रमात सावंत यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते वेणूगोपाल, विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, कोकण सरचिटणीस बी. संदीप आदी उपस्थित होते.या प्रवेशाबाबत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांनी माहिती दिली. ब्रिगेडीयर सुधीर सावंत हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवडून आले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे ब्रिगेडीयर सावंत यांनी त्यांना विरोध दर्शवित काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. सावंत यांनी सलग दहा वर्षे काँगे्रस पक्षापासून फारकत घेतली होती. मात्र, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे ॠणानुबंध अद्यापही कायम होते. गेल्या वर्षी गोवा येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनावेळी माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत  यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळेपासूनच ब्रिगेडीयर सावंत हे काँग्रेस पक्षात घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.  ब्रिगेडीयर सावंत यांनी मध्यंतरीच्या काळात मायावती यांच्या बहुजन समाज पार्टी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर बसपात त्यांचे मन न रमल्याने या पक्षाशी फारकत घेत त्यांनी स्वतःचा शिवराज्य पक्ष स्थापन केला होता. गेल्या वर्षी सावंत यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता आणि आता त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या अचानक पक्ष बदलण्याच्या धोरणामुळे सावंत यांच्यासोबत असणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनीही त्यांची साथ सोडली होती. त्यामुळे गेली काही वर्षे सुधीर सावंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणापासून अलिप्त होते. मात्र, पुन्हा त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँगेे्रस पक्षाची ताकद निश्‍चितच वाढणार आहे. सावंत हे पुन्हा स्वगृही परतल्यामुळे त्यांच्यापासून दुरावलेले निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांच्यासोबत काँगे्रस पक्ष वाढविण्यासाठी सक्रीय होणार आहेत. एकंदरीतच सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची बिकट परिस्थिती पाहता ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या रुपाने या जिल्ह्याला काँग्रेस पक्षाचा वजनदार नेता मिळणार आहे. लवकरच ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची महत्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here