कोकणाचे गावविकासाचे मॉडेल तयार व्हावे : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : कोकणातील सर्व ग्रामपंचायती सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. त्यातून गावविकासाचे एक मॉडेल बनविणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे व्यक्त केली. रत्नागिरी जिल्ह्यातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायती आणि निवडलेल्या सुंदर ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. ऊर्फ आबा पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मंगळवारी सायंकाळी स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. गावे सुंदर होण्यासाठी विशेष निधी राज्य शासनाकडून मी आणून देईन. जिल्हा परिषदेने मोठ्या ग्रामपंचायतींचा आराखडा बनवावा, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सूचित केले.

ते पुढे म्हणाले, येत्या महिनाभरात सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांची एमआयटी ग्रुप सरपंच परिषद घेणार आहे. शासनाकडून ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून विकास निधी दिला आहे. त्यातून ग्रामपंचायतींचे होणारे विकास आराखडे गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवले जातात. हे आराखडे तपासण्याची गरज आहे. त्यावेळी विकासकामांसाठी आग्रही असणाऱ्या सरपंचांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. विकास आराखडे केले जात असताना नियमानुसार होत नसतील तर संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकांनी ते सांगण्याची, दाखवून देण्याची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरावर २०१८-१९ या आर्थिक वर्षात निवडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रथम अंजनवेल (गुहागर) ग्रामपंचायतीला पाच लाख रुपये, द्वितीय जामगे (खेड) ला ३ लाख रुपये, तर तृतीय वालोपे (चिपळूण) ला २ लाखाचे पारितोषिक यावेळी वितरित करण्यात आले. जिल्हा परिषद गटांतर्गत एका उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड झालेल्या ५५ ग्रामपंचायतींचा सन्मानही करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षातील सुंदर गाव’ (स्मार्ट ग्राम) पुरस्कारासाठी १८ गावांची निवड झाली त्याच ग्रामपंचायतींचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:34 AM 17-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here