ठाकरेंच्या बॅनरबाजीतून भाजपला हा टोमणा तर नाही ना?

0

मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. निवडणूक लढवणारे आदित्य हे पहिले ठाकरे ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर सेनेची बॅनरबाजी सुरू झाली आहे. आदित्य यांच्या बॅनरवर गुजराती भाषेचा वापर करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर बहुभाषेतही बॅनर झळकले आहेत. त्यामुळे सेनेचा भाजपला हा  टोमणा तर नव्हे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा होताच त्यांचे बॅनर झळकले. गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्य यांच्या बॅनरवर गुजराती भाषेचा वापर करण्यात आला आहे. मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कांसाठी लढणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख सांगितली जाते. मात्र, सेनेने बहुभाषेत बॅनरबाजी केलेली पाहायला मिळत आहे. सेनेने गुजराती, हिंदी, उर्दु या भाषेंचा वापर प्रचाराच्या बॅनरबाजीसाठी केला आहे. काही दिवसांपूर्वी हिंदी दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अमित शहा यांनी आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक भाषा एका देशात बोलल्या जाणे याकडे काही लोक एखादे ओझे म्हणून पाहतात. मात्र एका देशात अनेक भाषा बोलले जाणं ही एक सुंदर बाब आहे. असे म्हटले होते. मात्र, असे असले तरीही देशाची अशी एक भाषा असणे खूप आवश्यक आहे असे सांगत शहा यांनी ‘एक देश एक भाषेचा नारा’ यावेळी दिला होता. शहा यांच्या याच वक्तव्याला सेनेचे प्रत्युत्तर म्हणून बहुभाषिक बॅनरबाजी आहे का? अशी विचारणा राजकीय वर्तुळात होत आहे. तसेच मतांसाठी शिवसेनेला मराठीचा विसर पडलाय का, असा सवाल सोशल मीडियावरुन उपस्थित केला जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here