भाजप हा राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष; म्हणून त्यांना दिला मोठा घास : शिवसेना

0

मुंबई : भाजप-शिवसेना युतीचे जागावाटप निश्चित झाले. भाजपला १६४ तर शिवसेनेला १२४ जागा मिळाल्या. युतीतील जागावाटपाबाबत शिवसेनेने भाष्य केले आहे. अखेर भाजप हा राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष असून त्यांना मोठा घास दिला असल्याचे शिवसेनेने मान्य केले आहे. युती म्हटली की, देवाण- घेवाण व्हायचीच. यावेळी शिवसेनेच्या बाबतीत घेवाण कमी व देवाण जास्त झाली हे मान्य करावेच लागेल, पण घेवाणीत जे आले त्यात शंभर टक्के यश मिळवायचेच असा आमचा निर्धार आहे, असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष बनला आहे. अनेक पक्षांतले प्रमुख लोक महाराष्ट्रात त्यांच्या ओसरीवर बसले आहेत. त्यांचा यथायोग्य पाहुणचार करायचा म्हटल्यावर त्यांना मोठा घास लागणार व आम्ही तो मोठ्या मनाने मान्य केला आहे. यास सिंहाचा वाटा म्हणायचे की आणखी काही हे ज्याचे त्याने ठरवायचे, पण भाजपच्या पदरात ‘मित्रपक्ष’ नामक दत्तk विधानेही जास्त आहेत, त्यांनाही वाटा द्यावा लागेल अशी एकंदरीत गोळाबेरीज झाली व त्यात शिवसेनेने सवाशेच्या आसपास जागा लढवण्याचे ठरवले, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या वाटेवर आतापर्यंत अनेक मांजरे आडवी गेली, अनेकांनी खड्डे खणले व काटे पेरले. त्या सगळ्यांना पुरुन उरलेली ही शिवसेना आहे याचे भान शिवसेनेच्या बाबतीत वेडीवाकडी स्वप्ने पाहणाऱ्यांनी ठेवले तर ते त्यांच्या आरोग्यासाठी बरे ठरेल, असा टोलाही लगावला आहे. युतीत दोन पक्षांची जास्तीत जास्त मुद्यांवर सहमती आहे. तसे विरोधकांच्या बाबतीत  सांगता येईल काय? रिंगणात उतरणे सोपे असते, पण रिंगणात टिकणे अवघड असते. आता मैदानही आमचे, रिंगणही आमचे व रिंगणात धावणारे विजयी अश्वही आमचे. युती झाली आहे, विजय पक्का आहे, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here