भाजपचे बंड? सेनेविरोधात थोपटले दंड!

0

चिपळूण : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात झालेल्या सेना-भाजप युतीत कोकणातून प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात पाचही मतदारसंघात सेनेचे उमेदवार जाहीर झाल्याने उत्तर रत्नागिरीतील चिपळूण व गुहागर मतदारसंघातील भाजप परिवार कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे समजते.विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात सेना-भाजप युती होईल की नाही या बाबत काल-परवापर्यंत राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण होते. या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर सेना-भाजपकडून सर्वच्या सर्व जागा लढविण्याची तयारी देखील झाली होती. तसेच उमेदवार देखील तयार ठेवण्यात आले होते. दरम्यान युतीच्या तडजोडीत जागा वाटप व जागांची संख्या या चर्चेमध्ये अखेर सोमवारी (दि.30) युती झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, जागा वाटपाबाबत स्पष्टीकरण झाले नाही. त्यापूर्वीच कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ मतदारसंघांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमात्र विधानसभेची जागा भाजपच्या वाट्याला आली. शिवसेनेने युतीची घोषणा होण्यापूर्वीच कोकणातील या मतदारसंघात आपापले प्रस्थापित सर्व उमेदवार एबी फॉर्मच्या माध्यमातून जाहीर देखील केले. परिणामी भाजपच्या वाट्याला एकमेव जागा सेनेने सोडल्याचे स्पष्ट झाले. उत्तर रत्नागिरीतील गुहागर व चिपळूण मतदारसंघ मिळावा अशी भाजपची मागणी होती. प्रामुख्याने गुहागर हा भाजप परिवाराचा परंपरागत मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच माजी आमदार विनय नातू  व भाजप परिवाराने दावा केला होता तर दुसरीकडे तुषार खेतल व चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या माध्यमातून चिपळूण मतदारसंघाचीही मागणी करण्यात आली होती. मात्र, सेनेने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागांवरील उमेदवार युतीपूर्वीच जाहीर केले. परिणामी गुहागर व चिपळूण मतदारसंघात इच्छुक असलेल्या भाजप परिवाराकडून व संबंधित पदाधिकार्‍यांकडून तीव्र नाराजी व्यक्‍त होऊ लागली आहे. युती झाली असली तरीदेखील या दोन्ही मतदारसंघातून भाजप परिवाराकडून स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एका माजी नेत्याच्या मार्गदर्शनाखाली चिपळुणात सोमवारी सायंकाळी उशिराने अत्यंत गोपनीय अशी बैठक झाली. तसेच गुहागर येथे संबंधितांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे समजते. या दोन्ही बैठकीत गुहागर व चिपळूण मतदारसंघातून भाजप परिवारातील उमेदवार उभे करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिपळुणातून तुषार खेतल अथवा सुरेखा खेराडे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यानुसार संबंधितांनी उमेदवारी भरण्यासाठी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. गुहागरमधून माजी आमदार डॉ. विनय नातू देखील रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू दि. 4 रोजी गुहागर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गुहागर मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती भाजपचे सचिव नीलेश सुर्वे यांनी पत्रकारांना दिली आहे. आग्रहास्तव बंड होण्याची शक्यता एकूणच युतीच्या जागा वाटपात कोकणात भाजपला नगण्य स्थान मिळाल्याने सेनेचा हा दुजाभाव व वर्चस्व वेळीच रोखण्यासाठी भाजपच्या काही खास दूतांमार्फत सेनेविरोधात बंडाचे दंड थोपटण्याची राजकीय चाल खेळली जात आहे. कोकणात भाजप वाढविण्यासाठी सेनेला वेळीच रोखण्याकरिता कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बंड होण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here