नवी मुंबई: ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघापैकी ऐरोली विधानसभा मतदारसंघांतून नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांना भाजपने उमेदवारी दिली मात्र बेलापूर मतदारसंघात विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांची भाजपकडून वर्णी लागली आहे. यामुळे ४५ नगरसेवकांसह भाजपात गेलेले गणेश नाईक नाराज झाले आहेत. आज, बुधवारी (दि. २) दुपारी बारा वाजता महापौर बंगल्यावर सर्व नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. यावेळी संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह गणेश नाईक उपस्थित राहणार आहेत. या महत्वपूर्ण बैठकीत गणेश नाईक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. बेलापूर मतदारसंघासाठी गणेश नाईक आग्रही होते. मात्र, त्याचे तिकिट कापल्याने नगरसेवक नाराज झाले आहेत. किंबहुना ऐरोलीतून संदीप नाईक निवडणूक लढवणार की, नाही असा ही गंभीर बाब उपस्थित केली जात आहे.
