सैन्यात जाणाऱ्या प्रत्येकाला एक गोष्ट सांगितली जाते. तसेच शिकवलीही जाते ती म्हणजे युद्ध…. पण हे युद्ध करुन जिंकण्या किंवा मरण्याची ऊर्मी जवानांच्यामध्ये निर्माण का होते. त्याच्यापाठीमागे एक अत्यंत महत्वाचे अवतरण आहे. भगवत गीतेमध्ये हे अवतरण दिले आहे… ते म्हणजे जर तू युद्धात धारातीर्थी पडलास तर स्वर्गात जागा मिळेल आणि जर विजयी झालास तर स्वातंत्र्यात पृथ्वीचे राज्य उपभोगाल. हेच अवतरण मनाशी बाळगून कारगिलमध्ये भारतीय जवानांनी बिकट आणि विपरित परिस्थितीत निकराचा लढा दिला आणि विजयश्री प्राप्त केली. बरोबर २० वर्षापूर्वी २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी केले आणि कारगिलवर तिरंगी झेंडा फडकवला. पाकिस्तानी घुसखोरांच्या तावडीतून संपूर्ण प्रदेश मुक्त केला. त्याच्याच स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. आज जशी विजयश्री साजरी करण्याचा दिवस आहे तसेच ज्यांच्यामुळे हा विजय आपल्याला मिळाला. त्या लढवय्या आणि भारतभूमिसाठी धारातिर्थी पडलेल्या भारतमातेच्या सुपुत्रांना आदरांजली वाहण्याचा त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस. कारगिलची लढाई १९९९च्या मे महिन्यात काश्मीरातील कारगिल जिल्ह्यातून सुरु झाली होती. या काळात मोठ्या संख्येने पाकिस्तानी घुसखोर आणि त्यांच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करुन भारतावर कुरघोडी करण्याचे दुःसाहस केले होते. एवढेच नाही तर लेह-लडाख या डोंगराळ भागाला मुख्य भूमिशी जोडणाऱ्या रस्त्यावरही कब्जा केला होता. त्यामुळे सियाचिन ग्लेशियर परिसरात भारताची स्थिती कमकुवत झाली होती. एकूणच भारतीय अस्मितेलाच हा एकप्रकारे धक्का होता. पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावण्यासाठी त्यावेळी भारतीय लष्करी जवानांनी शर्थीने लढा दिला. हे युद्ध जवळ-जवळ २ महिने चालले. एकीकडे भारताचा हा अस्मितेचा प्रश्न असताना परदेशी माध्यमे मात्र हा सीमावाद असल्याचे ढोल बडवत होते. मात्र या लढ्यात भारतीय लष्कर, वायुदलाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत घुसलेल्यांना हेरुन टिपले होते. या युद्धात भारतीय जवानांच्या जीविताची मात्र मोठ्या प्रमाणात हानी झाली. सुमारे ५२७ भारतीय लढवय्ये या युद्धात धारातीर्थी पडले. तिरंग्यासमोर घेतलेली शपथ त्यांनी सार्थ केली. तसेच सुमारे १३०० जवान जायबंदी झाले. देशासाठी कुणी आपला हात दिला तर कुणी आपला पाय. पण त्याचे दुःख कुणालाच नव्हते तर त्याचा या तिशीही पार न केलेल्या जवानांना अभिमान होता. भारताच्या वीरपुत्रांमध्ये कारगिलच्या निमित्ताने धारातिर्थी पडलेल्यांमध्ये नाव घ्यावे लागेल ते कॅप्टन विक्रम बत्रा यांचे. हिमाचल प्रदेशातील छोटेसे गाव पालमपूरच्या कॅप्टन विक्रम बत्रा यांनी कारगिल युद्धात उत्तुंग कामगिरी केली. जम्मू-काश्मीर रायफल्समधल्या बत्रा यांनी अनेक छोटी-मोठी शिखरे सर केली. कॅप्टन बत्रा यांची कामगिरी एवढी अतुलनिय होती की पाकिस्तानी सैनिकही त्यांना शेरशाह असे म्हणत असत. शत्रुशी लढताना त्यांनी अनेकांना यमसदनास पाठवले होते. जखमी अवस्थेतही शिखर क्रमांक ४८७५ वर हल्ला करताना त्यांना ७ जुलै रोजी वीरमरण प्राप्त झाले. कॅप्टन बत्रा यांना त्यांच्या कामगिरीबद्दल मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ने सन्मानित करण्यात आले. या युद्धातील दुसरे वीर जवान म्हणजे कॅप्टन अनुज नायर. १७ जाट रेजिमेंटच्या कॅप्टन अनुज नायर यांचा पराक्रम वाखाणण्याजोगा असाच आहे. टायगर हिल सेक्टरमधील ‘वन पिंपल’ या शिखरावर लढताना त्यांचे ६ सहकारी शहीद झाले. तरिही त्यांनी हार मानली नाही किंवा माघार घेतली नाही. अतिरिक्त कुमक येईपर्यंत या शिखरावर आपलाच कब्जा कायम राखला. हे शिखर शत्रूच्या हाती जाऊ दिले नाही. जणु काही बाजीप्रमु देशपांडेच त्यांच्यामध्ये संचारले होते अशी ही त्यांची कामगिरी होती. त्यामुळे हे शिखर शत्रूच्या हाती लागले नाही. मात्र गड आला आणि सिंह गेला याचप्रमाणे कॅप्टन नायर यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांना मरणोत्तर महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले. राजपूताना रायफल्सचे मेजर पद्मपाणी आचार्य यांचीही कारगिल युद्धातील कामगिरी अतुलनिय अशीच आहे. तलोलिंगमध्ये २८ जून १९९९ रोजी त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. तलोलिंगची लढाई कारगिल युद्धातील अत्यंत महत्वाची मानण्यात येते. कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मेजर पद्मपाणी आचार्य यांनाही मरणोत्तर महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले. लेफ्टनंट मनोज पांडे यांची कारगिल युद्धातील कामगिरी ही अशीच महत्वाची झाली. गोरखा रायफल्सच्या लेफ्टनंट मनोज पांडे यांनी बटालिक सेक्टरमधील जुबार टॉपवर आपला मोर्चा सांभाळला होता. गोरखा पलटनीच्या साथीने शत्रुला त्यांनी सळो की पळो करुन सोडले होते. अत्यंत दुर्गम अशा भागातील शत्रुचे बंकर त्यांनी नष्ट केले. गंभीर जखमी होऊनही त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र प्रदान करण्यात आले. कारगिल युद्ध आणि कॅप्टन सौरभ कालिया यांचे नाव हे एक समिकरणच झाले आहे. तलोलिंगच्या लढाईत मेजर आचार्य यांच्या खांद्याला खांदा लाऊन लढणारे कॅप्टन सौरभ यांनी तेवढीच बहादुरी दाखवली आहे. दुर्गम डोंगराच्या कडे कपारीत लपलेल्या शत्रुंचा त्यांनी खात्मा केला. कारगिलमधील सर्वात यातनापूर्ण बलिदान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शत्रुने त्यांना अघोरी यातना दिल्या. कानात तप्त रॉड घातले. डोळे काढले. गुप्तांगही कापले. अशा अवस्थेतील त्यांचे पार्थिव भारताच्या ताब्यात देण्यात आले होते. प्रचंड यातना सोसूनही मात्र त्यांनी आपली कोणतीच माहिती त्यांच्या हाती लागू दिली नाही. भारतीय वायुदलातील स्क्वाड्रन लिडर अजय अहुजा यांचे बलिदान कारगिल मधील भारतीय सैनिकांच्या शौर्याचा आदर्श असेच आहे. शत्रुने त्यांचे विमान उद्ध्वस्त केले. मात्र त्यातूनही ते डगमगले नाहीत. त्यांनी पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी घेतली. हवेतूनच खाली उतरताना त्यांनी गोळीबार केला. शत्रूशी लढता-लढताच गोळीबारात त्यांना हौतात्म्य आले. त्याचबरोबर फ्लाईट लेफ्टनंट नचिकेता यांना पाकिस्तानने युद्दबंदी केले होते. कारगिल युद्धातील हुतात्मे आणि जखमी सैनिकांची ही यादी खूपच मोठी आहे. या युद्धात एकूण ३० हजार पेक्षा जास्त अधिकारी आणि जवानांनी भाग घेतला होता. या सर्वांनीच राष्ट्रीय भावनेचे जाज्वल्य दर्शन घडवले आणि भारताला विजयश्री मिळवून दिली. त्या सर्वांचे स्मरण करण्याचा विजयोत्सव साजरा करण्याचा आजचा दिवस..! या दिवशी शौर्यभराने प्रत्येक भारतीयाच्या कंठातून शब्द उमटतात.. जय हिंद..! महत्वाची मानण्यात येते. कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मेजर पद्मपाणी आचार्य यांनाही मरणोत्तर महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले.
