यंदा पुरामुळे १४ राज्यांत १६८५ जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली : यंदा अतिवृष्टीमुळे देशातील अनेक भागांत हाहाकार उडाला. पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. यंदा सप्टेंबरअखेरपर्यंत पुराशी संबंधित घटनांमध्ये १४ राज्यांत १६८५ लोकांचा बळी गेला आहे. अद्यापही शेकडो लोक बेपत्ता आहेत. महाराष्ट्रात सर्वांधिक ३७७ लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या आकडेवारीवरून पुढे आली आहे.  यंदा मान्सून काळात आतापर्यंत २५ वर्षातील सर्वांधिक पाऊस झाला आहे. याचा देशातील २७७ जिल्ह्यांना तडाखा बसला. पाऊस आणि पुरामुळे पश्चिम बंगालमध्ये २२५, केरळमध्ये १८०, मध्य प्रदेशमध्ये १८०, गुजरातमध्ये १५०, बिहारमध्ये १३०, कर्नाटकमध्ये १०५,  आसाममध्ये ९७ लोकांचा मृत्यू झाला. सुमारे २२ लाख लोकांना पूर प्रभावित भागातून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. मनुष्यहानी सोबतच पशूधन, घरे, शेती आणि साधनसुविधांचेही मोठे नुकसान झाले. पूरग्रस्तांसाठी ८,७०० निवारे गृहे उभारण्यात आली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन (यूएनडीआरआर) च्या आकडेवारीनुसार, आपत्तीचा सर्वाधिक फटका गरीब लोकांना बसत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी २६ दशलक्ष लोक गरिबीच्या खाईत लोटत आहेत. १९९८ ते २०१७ या २० वर्षाच्या काळात आलेल्या आपत्तींमध्ये पुराने उद्भवलेल्या आपत्तीचे प्रमाण ४४ टक्के एवढे आहे. भूकंप, त्सूनामी, पूर आणि वादळ आदी घटनांपेक्षा हवामान बदलांमुळे होणारे परिणाम भंयकर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here