महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहीद स्मारकामध्ये पिंपळाच्या रोपांची लागवड

0

जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी उद्यानातील शहीद स्मारकामध्ये राष्ट्रीय हरीत सेना, सामाजिक वनीकरण, जळगाव वनविभाग तसेच मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळाच्या रोपांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शहीद स्मारकाजवळ बुधवारी चार पिंपळाची झाडे लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महात्मा गांधी यांनी १९३६ साली वर्धा येथील पवनार आश्रमात पिंपळाचे झाड लावले होते. या झाडाच्या बियांपासून तयार केलेली पिंपळाची रोपे यासाठी येथे आणण्यात आली आहेत. यावेळी १९५५च्या गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक शांताराम वाणी, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याहस्ते या चार वृक्षांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, विभागीय वन अधिकारी एस. आय. शेख, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार वैशाली हिंगे, वन परिक्षेत्र अधिकारी एन. जी. पाटील, भास्कर भोळे, नरेंद्र जावळे, बी. बी. जोमीवाले, पी. टी. वराडे, गोपीचंद सपकाळे यांच्यासह जिजामाता विद्यालयाचे हरीत सेनेचे विद्यार्थी, मातृभूमी सर्वांगीण विकास संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक वनीकरण, महापालिका व वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याचबरोबर जिल्ह्यातील शहीद स्मारक, आडगाव, ता. एरंडोल, शहीद स्मारक, पाचोरा, शहर वाहतूक शाखा, शहीद राकेश शिंदे स्मारक, जामनेर रोड, भुसावळ, शहीद नरेंद्र महाजन स्मारक, जुना सातारा चौफुली, भुसावळ, शहीद स्मारक नागलवाडी, ता. चोपडा येथेही पिंपळाचे वृक्ष लावण्यात आल्याची माहिती विभागीय वन अधिकारी शेख यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here