नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत भारतात जे घडत आहे त्यावरून महात्मा गांधींच्या आत्म्याला दु: ख होत असेल, असे म्हणत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाना साधला आहे. महात्मा गांधीजींचे नाव घेणे खूप सोपे आहे. परंतु, त्यांनी दिलेल्या विचारांचा मार्ग अवलंबणे सोपे नाही. गांधीजींचे नाव घेऊन भारताला ‘आपल्या’ मार्गावर घेऊन जाणारे लोक या आधीही होते. मात्र, गेल्या काही वर्षात ‘हे’ लोक साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर करून स्वत: ला खूप सामर्थ्यवान समजत आहेत, असे टीकास्त्रही त्यांनी भाजपवर सोडले आहे. दिल्ली येथे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कॉंग्रेस पदयात्रेच्या समाप्तीवेळी सोनिया गांधी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, काही लोकांना गांधीजींच्या ऐवजी आरएसएसला देशाचे प्रतीक बनवायचे आहे, पण हे शक्य नाही. कारण महात्मा गांधीजींचे विचार हे आपल्या देशाच्या पायाभरणीत ठासून भरले आहेत. जे लोक असत्यांवर आधारित राजकारण करीत आहेत त्यांना कसे समजेल की महात्मा गांधीजी हे सत्याचे पुजारी होते? ‘जे’ सत्तेसाठी सर्व काही करत आहेत, त्यांना गांधीजी हे अहिंसेचे उपासक होते हे कसे समजेल?, असे सवाल सोनिया गांधींनी उपस्थित करत सत्ताधा-यांना धारेवर धरले. महात्मा गांधीजींच्या मौलिक विचारांच्या पायावरच आजच्या भारताची जडणघडण झाली आहे. आणि याचा आपणा सर्व देशवासीयांना अभिमान असयाल हवा. आज जेव्हा आपला देश आणि संपूर्ण जग महात्मा गांधीजींची १५० वी जयंती साजरी करीत आहे त्यावेळी गांधीजींचे स्मरण हे सर्वांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ प्रदान करेल. भारत आणि त्याची गावे स्वावलंबी असावी अशी महात्मा गांधीजींची इच्छा होती. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसने गांधीजींनी आखून दिलेल्या मार्गावरून क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी पावले उचलली आहेत. केवळ कॉंग्रेसने गांधीजींच्या मार्गावरू मार्गक्रमण केले आहे आणि शेतकर्यांना नोकरी, शिक्षण आणि सुविधा पुरविल्या आहेत, जे अतुलनीय आहेत, असेही त्यांनी म्हटले.
