राणेंचे भाजप प्रवेशासाठी प्रयत्न सुरूच

0

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप अंतिम टप्प्यात आले असताना भाजपकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी भाजपच्या प्रवेशासाठी अखेरचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नाचाच भाग म्हणून त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यापासून भाजप प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करून सवता सुभा निर्माण केला. आता स्वतःचा पक्ष असतानाही ते भाजप प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी प्रवेश दिला जाईल, अशी राणे समर्थकांकडून अटकळ बांधण्यात आली होती. पण तीही फोल ठरली. कोकणात भाजपची ताकद नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या विरोधात वापर करण्यासाठी राणे यांना भाजपत प्रवेश दिला जाईल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली होती. शिवसेनेसोबत युती न झाल्यास त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. पण या निवडणुकीतही युती कायम राहिली. युतीच्या जागावाटपानंतर राणेंना भाजपत घेण्यास शिवसेनेचा विरोध मावळेल, असे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर राणे यांचे पुत्र नितेश यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे खासगी सचिव राजकुमार सागर यांच्याकडे दिलेला राजीनामा बागडे यांनी स्वीकारला. काँग्रेसचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनीही विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे आपल्या सदस्यपदाचा राजीनामा सुपूर्द केला. रघुवंशी यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर होते. यावरून ते सेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट होते. नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here