अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राणा दाम्पत्य बुलेटवरून विनामास्क सुस्साट

0

अमरावती : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ६,११२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. जवळपास तीन महिन्यांमध्ये प्रथमच राज्यात एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळून आले. अमरावती, यवतमाळ, नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मात्र लोकप्रतिनिधींना याचं किती गांभीर्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमरावतीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगानं वाढत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं, मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. रवी राणा आणि नवनीत कौर राणा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात राणा दाम्पत्य कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहे. दुचाकीवरून फिरणाऱ्या राणा दाम्पत्याच्या तोंडावर मास्क नाही. इतकंच काय त्यांनी हेल्मेटदेखील घातलेलं नाही. अमरावतीच्या रस्त्यांवर विनामास्क, विनाहेल्मेट रपेट मारणाऱ्या राणा दाम्पत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राणा दाम्पत्य सर्व नियम मोडून अमरावतीत फिरत असल्यानं कायदे हे केवळ सर्वसामान्यांसाठी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे अद्याप तरी राणा दाम्पत्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून राणा दाम्पत्याला नियम, कायद्यांमधून सूट देण्यात आली आहे का, असा सवाल सामान्यांना पडला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 20-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here