निर्यातबंदीमुळे कांदा होतोय स्वस्त

0

नवी मुंबई/ठाणे : गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने दर वाढत असल्यामुळे सर्वांनाच रडवणारा कांदा आता स्वस्त होऊ लागला आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय लागू केल्याचा परिणाम घाउक आणि किरकोळ बाजारपेठेत दिसू लागला आहे. घाउक बाजारात बुधवारी  30 ते 40 रुपये आणि किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये प्रतिकिलो कांदा विकला गेला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात गेल्या दोन दिवसांत कांद्याचे दर 30 ते 40 रुपये प्रतिकिलोपर्यंत स्थिर होते. तर किरकोळ बाजारात हेच दर 40 ते 50 रुपये प्रतिकिलोपर्यंत आले आहेत. गेल्या आठवड्यात हेच दर अनुक्रमे 50 ते 60 आणि 70 ते 90 पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे कांदा आता सर्वांनाच रडवणार असे वाटत असतांनाच केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेत सर्वांनाच दिलासा दिला आहे. नवी मुंबईच्या घाऊक बाजारात कांद्याची आवक सध्या 60 ते 70 गाड्या इतकीच आहे. मात्र मागणी 100 ते 120 गाड्यांची आहे. त्यामुळे सध्या असलेला भावही काहीसा जास्तच आहे. पावसामुळे कांद्याच्या चाळीतील कांदा खराब झाला आहे आणि शेतात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी कांदा शेतातच सडला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कांद्याची टंचाई आहे. बाजारात कांद्याची आवक वाढली, तरच कांद्याची मागणी पूर्ण करता येणार आहे. निर्यात थांबवून कांद्याची आवक घाऊक बाजारात किती वाढेल त्यावर दर अवलंबून राहणार आहे. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी नव्याने लागवड केली असून पावसानेही विश्रांती घेतल्याने कांद्याला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत बाजारात नवीन कांदा यायला सुरुवात होईल. त्यानंतर कांदा आणखीनच स्वस्त होणार आहे. तोपर्यंत त्याचे दर कमी जास्त होत राहणार असल्याचे दिसते. वाशी मार्केटमध्ये कांद्याची भाववाढ होण्यापूर्वी 100 ते 120 गाड्यांची आवक होत होती. तीच आवक भाववाढ झाल्यानंतर 60 ते 70 गाड्यांवर आली. मात्र आता निर्यातबंदीनंतर 20 ते 30 गाड्यांची आवक जास्त होत असून 80 ते 90 गाडी कांदा वाशी मार्केटमध्ये येत असल्याची माहिती कांदा व्यापारी संदीप चौधरी यांनी दिली. प्रामुख्याने नगर आणि पुण्यावरून कांदा मार्केटमध्ये येतो. मात्र गेल्या काही दिवसात पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपल्याने कांद्याची वाशी मार्केट, ठाणे शहर आणि उपनगरात होणारी आवक घटली आणि भाववाढ झाली. येणार्‍या 15 ते 20 दिवसांत कांद्याचे भाव स्थिर राहणार आहेत. मात्र जुना कांदा संपल्यानंतर नवीन कांद्याचे उत्पादन जास्त नसल्याने आवक कमी होणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here