दापोलीत होणार राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये ‘काँटे की टक्कर’

0

मंडणगड : विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याने शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये गेल्या चार वर्षांपासून तालुक्यात सुरु असलेली राजकीय वर्चस्वाची लढाई शेवटच्या टप्यात आली आहे. मात्र, येथे मतदारसंघातील ताकद समांतर अशीच आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये ‘काँटे की टक्कर’ अपेक्षित आहे. निवडणुकांच्या अगदी तोंडावर कुणबी पॅटर्न हा गेल्या निवडणुकीत प्रभावी ठरलेला मुद्दा नव्याने सक्रीय होत असल्याने दोन्ही दावेदारांना हा पॅटर्न डोकेदुखी ठरणार आहे. शिवसेनेचा प्रबळ प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीने गेल्या पाच वर्षात आपला क्रमांक एकचा दावा कायम ठेवल्याने आ. संजय कदम यांचे आव्हान कायम आहे. तीन वर्षे पन्नास-पन्नास टक्के असणारी मतांची टक्केवारी वाढेल असा प्रयत्न केल्याने लोकसभा निवडणुकीत गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच राष्ट्रवादीच्या उमेदवाराने मंडणगड तालुक्यात मताधिक्य मिळविले. या संदर्भात दावे-प्रतिदावे किती होत असले तरी वास्तवात गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादीने आपले मतदार पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढवले आहेत. गेल्या चार महिन्यात तालुक्यात झालेल्या घडामोडी पाहता शिवसेनेने आपले काठावरचे मताधिक्य वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या कालावधीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या ‘आयारामां’ची संख्या लक्षात घेता मतांच्या टक्केवारीचे गणित राष्ट्रवादीसाठी बिघडणारे असले तरी राष्ट्रवादीनेही फोडाफोडीचे राजकारण केले आहे. ही बाब दोन्ही पक्षांसाठी मोठ्या मताधिक्य विभाजनाचे कारण नक्कीच ठरू शकते. त्यामुळे दोन्ही प्रबळ उमेदवारांसाठी ही निवडणूक सहजसोपी राहिलेली नाही. गेल्या दोन महिन्यातील आर्थिक मंदी, बेरोजगारी व महागाईसारखे प्रश्न मतदारांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकू शकतात. सद्यस्थितीत तालुक्यातील मतदारांचे दोन मुख्य विचार प्रवाहातच विभाजन झाले आहे. त्यामुळे नव्याने सक्रीय होणार्‍या मुद्यांपेक्षा तालुक्यात सरस कोण राहील, पहिला नंबर कोणाचा,  मताधिक्य किती हीच मोठी चर्चा सुरू आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात आजवर पं. स., जि. प. आणि आमदारकीच्या निवडणुकीत आ. संजय कदम यांनी मतदानाच्या दिवशीच आपल्या विजयाचे फटाके फोडले. मात्र, यावेळी मतदानानंतर पहिला फटाका संजय कदम की योगेश कदम वाजवणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here