सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचा बुधवारचा संपूर्ण दिवस मुंबईत गेला. सिंधुदुर्गातील निवडणूक रिंगणात कोण उतरणार? आणि कोणते चिन्ह घेऊन उतरणार? हे निश्चित करण्यासाठी दिवसभर मुंबईत घडामोडी घडत होत्या. शिवसेनेचे नेते पालकमंत्री दीपक केसरकर सावंतवाडीतील वसंत केसरकर आणि डॉ. जयेंद्र परूळेकर या दोन काँग्रेसच्या नेत्यांना घेऊन मुंबईला गेले होते आणि तिथे त्यांनी मातोश्रीवर त्यांना शिवबंधन बांधून घेतले. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिलेल्या सतीश सावंत यांनी मंगळवारी दिवसभर अनेकांचा पाठींबा स्वीकारल्यानंतर बुधवारी मुंबई गाठली होती. तर आ. नितेश राणे यांना भाजपने एबी फॉर्म दिल्याची जोरदार चर्चा दिवसभर सुरू होती. बुधवारी सायंकाळपर्यंत तरी भाजप व शिवसेनेची दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे या याद्यांकडे सर्वांचे लक्ष होते. काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडीही सायंकाळपर्यंत जाहीर झाली नव्हती. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे उमेदवार कोण? याचे स्पष्ट उत्तर मिळाले नव्हते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचे तसेच मिडियाचे लक्ष मुंबईकडे लागले होते. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लढती कशा असतील याचे स्वरूप ठरवणारे निर्णय बुधवारी मुंबईत होणार होते. परंतु सायंकाळपर्यंत तरी केवळ चर्चा आणि गाठीभेटीच सुरू होत्या. निर्णय काही बाहेर पडले नव्हते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात बुधवारी सकाळी तीन बातम्या बाहेर पडल्या. त्यातील पहिली बातमी होती ती सावंतवाडीतील काँग्रेसचे नेते वसंत केसरकर आणि डॉ. जयेंद्र परूळेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची. पालकमंत्री दीपक केसरकर त्यांना तातडीने विमानाने मुंबईला घेऊन गेले. मातोश्री या ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत केसरकर आणि परूळेकर यांचा शिवसेना प्रवेश झाला. वसंत केसरकर हे 1969 सालात पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्याच वर्षी मालवण आणि सावंतवाडी येथे शिवसेनेच्या पहिल्या शाखा केसरकर यांनी स्थापन केल्या. त्यानंतर 15-20 वर्षे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे भक्कम नेटवर्क तयार केले. त्यानंतर मात्र केसरकर यांनी शिवसेना सोडली. सुरूवातीला ते जनता दलामध्ये कार्यरत होते. नंतर मात्र त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये काम केले. राणे यांनी काँग्रेस सोडली तरी देखील केसरकर हे काँग्रेसमध्येच होते. तब्बल 18 वर्षांच्या कालखंडानंतर त्यांनी बुधवारी मातोश्री या निवासस्थानी प्रवेश केला. आ. नितेश राणे यांना भाजपने एबी फॉर्म दिल्याची बातमीही सकाळी पसरली. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. दिवसभर ही बातमी टीव्ही चॅनेलवर आणि सोशल मिडियावर पुढे येत होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तशी लवकरच घोषणा करतील अशीही बातमी पसरली होती. मात्र पाटील यांची पत्रकार परिषद नंतर रद्द झाल्याचे सांगण्यात आले. राणे यांचा 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे यापूर्वी सांगण्यात येत होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यासाठी मुंबईत जाण्याच्या सुचना मिळाल्या होत्या. मात्र 2 ऑक्टोबरचा भाजप प्रवेश अखेर होऊ शकला नाही. हा प्रवेश आता लांबला असून तो 10 ऑक्टोबरला होणार अशी बातमी बाहेर आली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी दिवसभर शिवसेना, भाजप या पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांबरोबर स्वाभिमान पक्षाचेही काही कार्यकर्ते त्यांच्या कलमठ या निवासस्थानी भेटले होते. बुधवारी आणखी कोणी कार्यकर्ते त्यांची भेट घेणार का? याची चर्चा सुरू असताना सतिश सावंत यांनी बुधवारी सकाळी मुंबई गाठली. आ. नितेश राणे यांना भाजपचा एबी फॉर्म दिल्याची घोषणा अधिकृतरित्या भाजपच्या नेत्यांनी केली नव्हती. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण पुन्हा निर्माण झाले. त्याचवेळी सतीश सावंत यांना भाजपची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र सतीश सावंत यांच्या संपर्कात शिवसेनेचे नेते असल्याची माहिती संबंधित सुत्रांकडून मिळाली. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि सतिश सावंत यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे? सतीश सावंत मुंबईत ‘मातोश्री’वर आहेत का? याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चा सुरू होती. या घडामोडींमुळे कणकवली विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र काय असेल? याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या संदेश पारकर यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले आहे. भाजपकडे उमेदवारी मागितली आहे, अंतिम निर्णय अजून झालेला नाही आणि आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार याची माहिती पक्षाला दिली आहे, असे स्पष्ट केले आहे. आघाडीकडून कणकवली हा मतदारसंघ काँग्रेसकडे दिल्याचे सांगण्यात येत असून देवगड येथील सुशील राणे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकते अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. कुडाळ विधानसभा मतदारसंघात आ. वैभव नाईक यांच्या विरोधात स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. त्याचवेळी काँग्रेसकडे जाणार्या या मतदारसंघातून पुष्पसेन सावंत की काका कुडाळकर उमेदवार असतील अशी चर्चा सुरू असताना माजी आ. पुष्पसेन सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी बाहेर पडली होती. समोर कोणीही उमेदवार असला तरी शिवसेनेचे आ. वैभव नाईक यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचे रान उठवले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री दीपक केसरकर शिवसेनेचे उमेदवार असून ते गुरूवारी 4 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी बुधवारी वसंत केसरकर आणि डॉ. जयेंद्र परूळेकर यांचा शिवसेना प्रवेश घडवून आणल्यामुळे काँग्रेस गोटात खळबळ उडाली होती. दीपक केसरकर गेले दोन-तीन दिवस शिवसेनेत कार्यकर्त्यांचा प्रवेश घेण्यात आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये भाजपाचे राजन तेली यांच्या समर्थकांचाही समावेश होता. राष्ट्रवादीकडून सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. त्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा साळगावकर यांना पाठिंबा मिळणार असल्याची अपेक्षा साळगावकर यांच्या समर्थकांना आहे. स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब हे मात्र सध्या शांत असून ते स्वाभिमान पक्षामध्ये सध्या कार्यरत आहेत असे सांगण्यात आले. आता गुरूवारी काय काय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. भाजपच्या दुसर्या यादीत नितेश राणे यांचे नाव असेल का? त्यांना भाजपचा एबी फॉर्म मिळेल का? त्यानंतर शिवसेनेची भूमिका काय असेल? सतीश सावंत यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार का? काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असतील? आणि या पार्श्वभूमीवर बंडखोरी कोण करेल? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी बहुधा गुरूवारची वाट पहावी लागेल.
