रत्नागिरी : ठाणे शहर अंतर्गत कोपरी पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गँगस्टर सिद्धेश बाळा म्हसकर ऊर्फ सिद्धू अभंगे (28, रा. सिद्धार्थ नगर, कोपरी कॉलनी, ठाणे) याला चिपळूण रेल्वेस्टेशन येथून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मंगळवारी अटक केली. पुढील कार्यवाहीसाठी त्याला कोपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अभंगेवर खून व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरोधात कोपरी पोलिस स्टेशनकडून एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. तो फरार झालेला असल्यामुळे त्याचा कोपरी पोलिस स्टेशनकडून शोध सुरू होता. त्याचा शोध घेण्याबाबत कोकण परिक्षेत्र अंतर्गत सर्व जिल्ह्यांना कळविण्यात आलेले होते. त्यानुसार त्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून देखील शोध सुरू होता. दरम्यान, मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिरीष सासने यांना अभंगे हा कोकण रेल्वेने गोवा ते मुंबई असा प्रवास करीत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक तयार करून कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाया गाडयांमध्ये आरोपीचा शोध घेण्याकरता रवाना केले होते. तपासादरम्यान पथकाने रेल्वे गाड्यांमध्ये शोध घेतला असता मांडवी एक्स्प्रेसमधून अभंगे प्रवास करीत असल्याचे दिसून आले. त्याला चिपळूण रेल्वेस्टेशनला ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीकरिता कोपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोहेकॉ संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, नितीन डोमणे, दत्ता कांबळे तसेच गुहागर पोलीस स्टेशनकडील मारुती जाधव, चिपळुण पोलिस स्टेशनकडील आशिष भालेकर व अलोरे पोलिस स्टेशनकडील गगनेश पटेकर यांनी केलेली आहे.
