रत्नागिरी : जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकारी, सदस्य यांच्यातील संघर्षाचे ग्रहण सुटता सुटेना झाले आहे. त्यात आता काही जि.प. कर्मचार्यांनीही उडी घेतल्याने या कर्मचार्यांना पदाधिकार्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या विरोधातील पदाधिकारी व सदस्य यांच्यातील संघर्ष तीव्र बनला आहे. सोमवारी अविश्वास ठरावाबाबत आयोजित बैठकही आचारसंहितेचे कारण देत प्रशासनाने रद्द केली. यामुळे सध्या तरी आचारसंहितेने अविश्वास ठराव वाचवला आहे. आता 13 नोव्हेंबरला अविश्वास ठरावासाठी बैठक होणार आहे. काही कर्मचार्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीच्या बाजूने उभे राहत समर्थन दिले आहे. एका अर्थाने पदाधिकार्यांच्या विरोधात अप्रत्यक्षरित्या दंड थोपटले असल्याचा समज पदाधिकार्यांनी करून घेतला आहे. सध्या एका कर्मचारी संघटनेने शासनाला कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या उत्तम कामकाजाबद्दल निवेदनही दिले आहे. गोयल यांच्या पारदर्शी कारभाराबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आले आहे. त्यातच गोयल यांच्या बाजूने काही कर्मचारी सह्यांची मोहीम राबवत आहेत. पदाधिकारी, सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील वादात कर्मचार्यांनी उडी घेतल्याने आता यामध्ये गुंतागुंत निर्माण झाली आहे. वास्तविक मुख्य कार्यकारी अधिकार्यांवर अविश्वास ठराव दाखल करण्याचा पदाधिकारी व सदस्यांचा हक्क आहे. जिल्हा परिषद अधिनियम 1961 मधील कलम 94(3) नुसार हा अविश्वास ठराव टाकला जाऊ शकतो. मात्र यामध्ये कर्मचारी हस्तक्षेप करत असल्याचा समज पदाधिकार्यांनी करून घेतला आहे. त्यामुळेच त्यांचा रोष कर्मचार्यांना सोसावा लागणार आहे, हे मात्र नक्की.
