ब्रेकिंग : रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

0

रत्नागिरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रत्नागिरी जिल्हयामध्ये नियंत्रणात ठेवण्याच्या हेतुने व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. त्यानुसार लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार आजपासून रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत रात्रौ 09.00 ते सकाळी 05.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरीता नेमण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी व वैदयकीय कारणास्तव रुग्ण व त्याच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. सदर वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

सदर आदेश संपुर्ण रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रात दिनांक 22/02/2021 रोजी मध्यरात्री 12.00 वा. पासून ते या कार्यालयाचे पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील. असे आदेशात म्हटले आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी आदेश जारी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे व दिवसेंदिवस कोरोना विषाणूने बाधीत व्यक्तींच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे

◼️ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होत असणाऱ्या विविध क्रिडा स्पर्धा उदा. कबड्डी, क्रिकेट, खो-खो, इ. यांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या पुर्वपरवानगी शिवाय भरविण्यास मनाई करण्यात येत आहे.

◼️ स्थानिक प्राधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय आठवडे बाजार, जनावरांचे बाजार, भरवता येणार नाहीत.

◼️ कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक, धार्मिक समारंभ साखरपुडा, मुंज, पुजा, आरती, नमाज इत्यादी ज्यामध्ये 50 च्या मर्यादेपर्यंत लोक एकत्रित येण्याची शक्यता आहे अशा कार्यक्रमांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

◼️ उदयाने, मोकळया जागा, मनोरंजन पार्क, क्रिडांगणे, समुद्र किनारे अशा ठिकाणी एकाच वेळी 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास या आदेशाव्दारे मज्जाव करण्यात येत आहे.

जिल्ह्यात विनापरवाना जत्रा, यात्रा, ऊरुस भरविण्यास मनाई

महाराष्ट्र शासनाकडील दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजीच्या आदेशास अनुसरुन कोरोना प्रतिबंधासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे अटी शर्तींवर खुली करणेस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यात्रा, जत्रा, ऊरुस भरविण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज प्राप्त होत आहेत असे निदर्शनास आले आहे. तथापि या कामी रत्नागिरी जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, यात्रा, जत्रा, ऊरुस यांमधील फक्त धार्मिक विधी करण्यास 50 माणसांच्या मर्यादेत परवानगी देण्यात येत आहे. तथापि, याकामी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्ह्यात विनापरवाना जत्रा, यात्रा, ऊरुस भरविणेस मनाई करण्यात येत आहे.

मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याच्या हेतुने वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार मास्क न वापरणारे यांचे विरुध्द 500/- रुपये दंड आणी प्रचलित नियमाप्रमाणे कारवाई करणेत येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:40 PM 23-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here