रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर खानू नजीक अवघड वळणावर गोव्याहून रत्नागिरीकडे जाणा-या इनोव्हा कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटून समोरुन येणा-या महिंद्रा बोलेरो टेम्पोला धडक देऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे दोन्ही वाहने रस्त्यातच असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या अपघातासंदर्भात पाली पोलीस दुरक्षेत्रातुन मिळालेली माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावर पाली नजीक खानू गावच्या हद्दीत रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान गोवा येथून इनोव्हा कार क्र. एमएच०३ डीजे ३५३ घेऊन चालक महमंद हाजीलियाकत खान रा. मुंबई हा मंबईच्या दिशेने जात असताना खान नजीक तीव्र उताराचे वळणावर त्याचा वाहनावरील ताबा सुटून विरुद्ध बाजुला जाऊन समोरुन येणा-या महिंद्रा बोलेरो टेम्पो क्र. एमएच०८ एपी ०८०७ ला पाठीमागील होद्याला धडक देऊन अपघात झाला. यामध्ये टेम्पो चालक रुपेश रमेश पावसकर हे मासे घेऊन गोव्याकडे जात होते. या दोन्ही वाहनांची महामार्गावर मधोमध धडक झाल्याने काहीवेळ वाहनांना अडथळा येत होता. अपघातानंतर पाली पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस नाईक विनायक राजवैद्य व पोलीस कॉन्स्टेबल सुमित चिले व महामार्ग वाहतुक पोलीस हातखंबाचे वाहतुक पोलीसांनी तातडीने अपघात स्थळी येऊन वाहतुक व्यवस्था सुरळीत केली. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दुरक्षेत्रात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
