रत्नागिरी : ऐन नवरात्रौत्सवात एकीकडे दुर्गाशक्तीचा जागर होत असताना, प्रत्यक्ष खाकी-सफेद वर्दीतील दुर्गेचे ममत्व आणि सामाजिक बांधिलकीचा अनुभव बुधवारी रत्नागिरीकरांना आला. वाहतूक पोलिस दमयंती शिंदे यांनी आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून उचलेल्या पावलाचे कौतुक होत आहे. असे कर्तव्यदक्ष, समाज बांधिलकी जपणारे पोलिस असतील तर पोलिसांबद्दल समाजाचा दृष्टीकोनही चांगलाच होईल. त्याचे झाले असे…. बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी एसटी स्टँडच्या उतारात भररस्त्यात मधोमध एक पुरूष मद्यधुंद अवस्थेत पडलेला होता… त्याच्या पायाला जखमा झालेल्या होत्या… त्याला कसलीही शुद्ध नव्हती. मात्र जाणार्या- येणार्या कोणीही त्या मद्यधुंद पुरूषाला बाजूला केले नाही. उलट आजूबाजूच्या चहा-नाश्ताच्या टपर्यांवर त्या मद्यधुंद पुरूषाच्या गजाली रंगल्या…तो अशा बघ्यांच्या दृष्टीने जणू चेष्टेचाच विषय बनला… त्यामुळे कोणीही त्याला बाजूला करत नव्हते. माणुसकीला काळीमा फासणारे बघ्ये एकीकडे स्वत:ला पुरूष म्हणवून घेत असताना मद्यधुंद पुरूषाला मदत करण्यास गेले नाहीत. मात्र अशातच एक वाहतूक पोलिस याच रस्त्याने ड्युटीवर निघाली होती… रस्त्याच्या मधोमध पडलेल्या त्या पुरूषाला तिने माणुसकीच्या नात्याने मदत करायचे ठरवले… जमलेल्या बघ्यांना मदत करण्याची आर्जवही त्यांनी केली. मात्र कुणीही पुढे आले नाही… शेवटी त्या रणरागिणीने जिल्हा रूग्णालयात फोन करून याची माहिती दिली… त्यानंतर एक रूग्णवाहिका डॉक्टर आणि एका वॉर्डबॉयसह तिथे आली….यावेळी स्वत: महिला पोलिसाने स्ट्रेचरवर त्या पुरूषाला वॉर्डबॉयच्या मदतीने उचलण्यास सुरूवात केली….अन् त्या बघ्यांपैकी एकाला उशिरा का होईना मदत करावीशी वाटली…त्या पुरूषाला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.. वाहतूक पोलिस दमयंती शिंदे यांच्या या माणुसकीला नवदुर्गांच्या उत्सवात सलाम!
