नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियन पी. व्ही. सिंधू व माजी विजेता किदाम्बी श्रीकांतसह भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंना पॅरिस येथे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या फ्रेंच ओपन वर्ल्ड टूर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कठीण ‘ड्रॉ’ मिळाला आहे. गेल्या महिन्यात चीन व कोरिया ओपन स्पर्धेत सुरुवातीच्या फेरीतच बाहेर पडलेल्या सिंधूसमोर पहिल्या फेरीत मिशेल लीविरुद्ध खेळायचे आहे. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणार्या श्रीकांतने 2017 साली ही स्पर्धा जिंकली होती. श्रीकांतचा सामना पहिल्या फेरीत चीन तैपेईच्या जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या टियेन चेनशी होणार आहे. टियेनने गेल्या तीन सामन्यांत श्रीकांतला पराभूत केले आहे. श्रीकांतला दुखापत झाल्याने चीन ओपन व कोरिया ओपनमध्ये त्याने सहभाग नोंदवला होता. भारताच्या सायना नेहवालचा सामना हाँगकाँगच्या चेयुंग नगान यी शी होणार आहे. अन्य भारतीयांमध्ये बी. साई प्रणीतसमोर लिन डॅनचे आव्हान असेल. समीर वर्माची गाठ केंटो निशिमोतो व एच. एस. प्रणॉयसमोर माजी जागतिक चॅम्पियन व्हिक्टर अॅक्सेलसेनशी होईल. कोरिया ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या पारुपल्ली कश्यपसमोर हाँगकाँगच्या एन. जी. का लांग अंगुसचे आव्हान असेल. सात्विक साईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष जोडीसमोर जेली मास आणि रॉबिन टेबलिंग या नेदरलँडच्या जोडीचे आव्हान आहे. मनु अत्री व बी. सुमीत रेड्डीची गाठ इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन वेंडीशी होईल. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डीची गाठ दक्षिण कोरियाच्या पाचव्या मानांकित ली सो ही आणि शिन सियुंग चानशी होईल. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा आणि सिक्कीची गाठ पहिल्या फेरीत ख्रिस एडकॉक व गॅब्रिल एडकॉकशी होईल. तर, सात्विक आणि अश्विनीसमोर कोरियाच्या चौथ्या मानांकित सियो सियुंग जे आणि चेई युजुंगचे आव्हान असेल.
