महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ करणार असाल तर…; शिवसेनेचा भाजपला थेट इशारा

0

मुंबई : पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ करण्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून शिवसेनेनं भाजपला थेट इशारा दिला आहे. ‘पुद्दुचेरी झालं, आता महाराष्ट्र’ असं स्वप्न आता काही जणांना पडत असेल तर त्यांनी स्वप्नातच राहावं, असा टोला शिवसेनेनं सामनामधून लगावला आहे. महाराष्ट्राचं मन खंबीर आहे, इरादे पक्के आहेत. मध्य प्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत, अशा स्पष्ट शब्दांत शिवसेनेनं भाजपला इशारा दिला आहे.

काँग्रेसच्या नाराज आमदारांनी राजीनामे दिल्यानं पुद्दुचेरीतलं नारायणसामी यांचं सरकार कोसळलं. यावरून शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री नारायणसामी यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पाच आमदारांनी बेडुकउड्या मारल्याने सामी यांचे सरकार अल्पमतात आले. पाच आमदारांनी साडेचार वर्षांपर्यंत काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यात अण्णा द्रमुकचे आमदारही होते, पण आता हे सर्व आमदार कमळफुलाचे भुंगे बनले आहेत. विधानसभा चारेक महिन्यांत लागतील. तोपर्यंत भाजप किंवा केंद्र सरकारला थांबता आले असते, पण येथेही सरकार पाडून दाखवले असा टेंभा मिरवायला भाजप मोकळा झाला,’ अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपचा समाचार घेतला आहे.-
शिवसेनेचं भाजपवर शरसंधान-पुद्दुचेरीतले सरकार पाडून दाखवले, आता मार्च-एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ला सुरुवात करू, असे काही भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केले. मध्य प्रदेशातील सरकार पाडले तेव्हाही ”पुढचा घाव महाराष्ट्रावर” असे जाहीरच केले होते. त्यानंतर ”बिहारचे निकाल एकदाचे लागू द्या, मग पहा महाराष्ट्रात कसे परिवर्तन घडवून दाखवतो” वगैरे बतावण्या करून झाल्या. आता बात पुद्दुचेरीची सुरू आहे, पण जशी ‘दिल्ली बहुत दूर है’ त्याप्रमाणे ‘महाराष्ट्र तो बहुतही दूर है!’ असे चित्र आहे. पुन्हा मध्य प्रदेश, पुद्दुचेरीत काँग्रेस होती. महाराष्ट्रात शिवसेना आहे. त्यामुळे कोणी नसती उठाठेव करण्याच्या भानगडीत पडू नये.

पुद्दुचेरीत सरकार पाडण्यासाठी ज्या खटपटी व लटपटी झाल्या ते सर्व प्रयोग महाराष्ट्रातही करून झाले. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी सामी यांच्या सरकारला धड काम करू दिले नाही. हे राज्य केंद्रशासित असल्याने तेथील राज्यपालांना जरा जास्तच अधिकार असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला लोकहिताचा प्रत्येक निर्णय किरण बेदी फिरवू लागल्या. अर्थात, दिल्लीचे आदेश असल्याशिवाय नायब राज्यपाल असे वागणार नाहीत.

राज्यपाल महाराष्ट्राचे असोत नाहीतर पुद्दुचेरीचे, त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी करायच्या असतात. राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा केला जातो. किरण बेदी यांनाही कढीपत्त्याप्रमाणे वापरून फेकून दिले आहे हे महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या ‘भाज्यपालां’नी समजून घेतले पाहिजे.

केंद्रीय सत्तेचा वापर करून विरोधकांची राज्यांतील सरकारे पाडायची हे सध्या काही जणांना शौर्य वगैरे वाटत असेल तर ते चूक आहे. मध्य प्रदेशातील महाराजा शिंदे व त्यांच्या समर्थकांना फोडून, आमिषे दाखवून भाजपने बहुमत विकत घेतले. पुद्दुचेरीतही वेगळे काय घडले? पुद्दुचेरीत सध्या जे काय घडतेय हा राजकीय वेश्या व्यवसाय असल्याचा संताप मुख्यमंत्री नारायणसामी यांनी व्यक्त केलाय, पण या वेश्या व्यवसायापासून गेल्या सत्तर वर्षांत कोणी अलिप्त राहिले आहे काय?

तत्त्व आणि नीतिमत्ता गुंडाळून फक्त सत्ता मिळविण्यासाठी जे राजकारण सुरू आहे ते चिंताजनक आहे. प. बंगालपासून पुद्दुचेरीपर्यंत, महाराष्ट्रापासून जम्मू-कश्मीरपर्यंत दलबदलूंसाठी लाल गालिचे अंथरायचे व राजकीय कळसूत्र्यांचा खेळ चालवायचा हे कुणालाच शोभणारे नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:46 AM 24-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here