चिपळूण : शहरातील गुहागर बायपास रस्त्यावरुन रात्रीच्या वेळी विनापरवाना वाळुची वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. चिपळूण पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एक डंपर जप्त केला असून तीन ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. या बाबत चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव यांनी दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वा. उक्ताड येथे ही धडक कारवाई केली. यामध्ये ४ लाख ५९ हजार रूपयांच्या वाळूसह डंपर जप्त करण्यात आला आहे. यामध्ये डंपरची किंमत ४ लाख ५० हजार रूपये असून ९ हजार रूपयांची तीन ब्रास वाळू पकडण्यात आली आहे. या प्रकरणी अंजनीलाल रामचंद्रलाल (रा. बिहार), प्रवीण लक्ष्मण कदम (गोवळकोट) व संदेश प्रवीण रेडीज (गोवळकोट) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना वाळू डंपरमध्ये भरुन चोरी करुन नेत हा डंपर पकडण्यात आला. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.
