प्रतापगड : किल्ले प्रतापगडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला नवरात्रौत्सवातील चतुर्थीला ३५९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने किल्ले प्रतापगडावर रात्री ३५९ मशाली पेटवण्यात आल्यानंतर किल्ले प्रतापगड मशालींनी उजळून निघाला. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातन हजारो शिवभक्त प्रतापगडावर दाखल झाले होते. सन २०१० पासून ही परंपरा सुरू आहे. छ. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. महाराजांच्या आदेशाने पानसरे म्हणजे गडाचे किल्लेदार हवलदार यांनी नेपाळच्या गंडकी नदीमधील शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून गडावर भवानी मातेची स्थापना केली. राजमाता श्री.छ. कल्पनाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून चंद्रकांत उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मशाल महोत्सव सुरू आहे.
