कुणकेश्वरची यात्रा कोरोना निर्बंधाचे पालन करून मर्यादीत स्वरुपात होणार

0

श्री क्षेत्र कुणकेश्वरमध्ये दरवर्षी माघ कृष्ण त्रयोदशीला महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा होते. यावर्षी 11 मार्च ते 13 मार्च हे तीन दिवस यात्रा होणार आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यात्रा मर्यादीत स्वरुपात आणि कोरोना निर्बंधांचे पालन करून होणार आहे, यंदा ही यात्रा फक्त ग्रामस्तरावर घेण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टच्यावतीने घेण्यात आला आहे.

यात्रोत्सवात सहभागी होणारे भावीक, व्यापारी यांना श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे. देवस्थान ट्रस्टने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आपणा सर्वांच्या आरोग्याचा विचार करता यावर्षीचा यात्रोत्सव साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सर्व भावीक, भक्तांनी, यात्रेकरुंनी व व्यापारी वर्गाने नोंद घ्यावी. यावर्षी महाशिवरात्री यात्रा कालावधीत दुकाने, खेळ, आकाशपाळणे, हॉटेल्स व इतर व्यापारी वर्गास परवानगी असणार नाही. मौजे कुणकेश्वर गाव स्तरावर मंदिरामध्ये होणारी पारंपारीक धार्मिक विधीवत पूजा – कार्यक्रम केले जाणार आहेत. शासनाच्या आदेशांचे व निर्बधांचे पालन करुन ग्रामस्तरावर यात्रा उत्सव केला जाणार आहे. त्यामुळे बाहेरुन येणारे भावीक, भक्त, पाहुणे मंडळींना, भजनी मंडळींना, वारकरी सांप्रदायिक मंडळे, रथयात्रा, यात्रेकरु, पर्यटक, व्यापारी वर्गाना सहभागी होता येणार नाही. त्यामुळे श्री देव कुणकेश्वराच्या महाशिवरात्री यात्रोत्सवात सहभागी न होता आपण जेथे असाल तेथुनच ‘श्रीं’ ना नमस्कार करावा व सर्वांच्या आरोग्याचा विचार करुन सहकार्य करावे. श्री देव कुणकेश्वरचा आशीर्वाद आपणा सर्वांवर अखंडित आहे व आपण प्रार्थना करावी लवकरात लवकर कोरोनाच्या संकटातून जग मुक्त करुन आम्हाला दर्शनाचा लाभ मिळो, असे आवाहन कुणकेश्वर ग्रामस्थ आणि कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:38 PM 25-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here