नितेश राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

0

कणकवली : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, खा. नारायण  राणे यांचा भाजप पक्षातील प्रवेश लांबला असला तरी गुरुवारी  त्यांचे धाकटे चिरंजीव, माजी आ. नितेश राणे यांना भाजपच्या कणकवलीतील जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. भाजप पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून ते कार्यकर्त्यांसह भाजपवासी झाले. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांना शुक्रवारी (दि. 4) सकाळी 10 वाजता भाजप मेळाव्यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते एबी फॉर्म दिला जाणार आहे. त्यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली. जेव्हा नितेश राणे यांचे भाजप कार्यालयाजवळ आगमन झाले तेव्हा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर राणे यांचा कार्यालयात प्रवेश झाल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत आनंद व्यक्‍त केला. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी गुरुवारी दुपारी तातडीने भाजप जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली, त्याचवेळी माजी आ.नितेश राणे हे भाजप जिल्हा कार्यालयात येवून प्रवेश करणार आहेत, अशा बातम्या सोशल मीडियावर सुरू होत्या. त्यातच स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हा कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे राणेंच्या प्रवेशाकडे प्रसार माध्यमांसह सर्वांचेच लक्ष लागले होते. दुपारी साडेबारा वाजता माजी आ.नितेश राणे यांचे कणकवली येथील भाजप जिल्हा कार्यालयात आगमन झाले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आ.नितेश राणे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा फॉर्म भरला आणि मिसकॉल देवून भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.  यावेळी स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी, जि.प.चे माजी अध्यक्ष गोट्या सावंत, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी सभापती सुरेश सावंत, दिलीप रावराणे, जयेंद्र रावराणे, संतोष आग्रे, संदीप मेस्त्री, स्वाभिमानचे नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर भाजपकडून जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, जयदेव कदम, जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे, राजन चिके, रवींद्र शेटये, महिला तालुकाध्यक्षा गीतांजली कामत, भाई सावंत, बबलू सावंत, शिशिर परूळेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद जठार यांनी नितेश राणे यांच्या भाजप प्रवेशाची माहिती दिली. त्यांचे भाजप परिवारात स्वागत करतो, भाजपची ध्येयधोरणे, शिस्त, परंपरा यांचे पालन करून नितेश राणे पक्षात काम करतील, त्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षात योग्य तो सन्मान दिला जाईल. त्यांच्या प्रवेशाने कोकणातील भाजपच्या नवीन पर्वाला सुरुवात झाल्याचे सांगितले. भाजप नेते अतुल काळसेकर म्हणाले, भाजप पक्षाला एक परंपरा आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. 2009 साली माजी आ.अजित गोगटे यांनी प्रमोद जठार यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. तर आता प्रमोद जठार यांनी  नितेश राणे यांना येथील उमेदवारी दिली आहे. पक्षाची एक परंपरा आणि शिस्त आहे. त्यामुळे राणे आणि भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी किंतू, परंतु दूर करून एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे काळसेकर म्हणाले. भाजप पक्ष प्रवेशानंतर बोलताना नितेश राणे म्हणाले, पक्षासाठी जे जे योगदान देता येईल ते देवू. पक्षशिस्त, परंपरा, ध्येयधोरणे यांचे पालन करून पक्ष देईल त्या आदेशाप्रमाणे काम करू. सिंधुदुर्गातच नव्हे तर कोकणात भाजप पक्ष नंबर वन करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. राज्यात भाजप-शिवसेना महायुती आहे. कणकवली मतदारसंघात तुम्ही महायुतीचे उमेदवार असणार आहात, मग कुडाळ, सावंतवाडीमध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार का? किंवा शिवसेना तुमच्या प्रचारात सहभागी होणार का? असा प्रश्‍न नितेश राणे यांना विचारला असता. आपण महायुतीचाच उमेदवार आहे. त्यामुळे निश्‍चितपणे महायुतीचा धर्म पाळला जाईल, आता ते पाळतात का हे पहावे लागेल, असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नावर बोलताना सांगितले. स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाला का? असा प्रश्‍न विचारला असता आता आपण प्रवेश केला आहे, खा.नारायण राणे यांच्या प्रवेशानंतर तो विलीन होईल, असे नितेश राणे यांनी सांगितले. नाणार प्रश्‍नाबाबतची आपली भूमिका मेळाव्यात स्पष्ट करेन असे ते म्हणाले. राणेंच्या प्रवेशाच्या गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरू आहेत. त्यांचा प्रवेश कधी होणार? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता प्रमोद जठार यांनी त्याबाबतही लवकरच निर्णय होईल. कणकवलीच्या भूमीतच प्रवेश व्हावा, अशी नितेश राणे यांची इच्छा होती. त्यामुळे तो प्रवेश इथे झाला, असे सांगण्यासही जठार विसरले नाहीत. राजन तेली यांनी युती असतानाही सावंतवाडीत अर्ज दाखल केला आहे, तर संदेश पारकर यांनीही कणकवलीतून अर्ज दाखल केला आहे. याकडे प्रमोद जठार यांचे लक्ष वेधले असता येत्या 7 तारीखला सर्व चित्र स्पष्ट होईल. प्रदेश स्तरावरून हा विषय सोडविला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here