मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी काल, रात्री रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. दिपाली सय्यद मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार असणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा शिवसेनेकडून लवकरच केली जाणार असल्याचे समजते. मुंब्रा-कळवा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शिवसेनेकडून शोध सुरु होता. येथे शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. अशातच दीपाली सय्यद यांचे नाव चर्चेत आले. मुंब्रा-कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड सलग दोनवेळा विजयी झाले आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ही जागा जिंकता आली नव्हती. आता शिवसेना येथून दीपाली सय्यद यांना रिंगणात उतरवणार आहे. दीपाली सय्यद यांनी जत्रा, उचला रे उचला, मुंबईचा डबेवाला, मास्तर एके मास्तर अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी बंदिनी, दुर्वा या मालिकांमधून काम केले आहे. त्यांनी २०१४ मध्ये आम आदमी पक्षाच्या तिकीटावर अहमदनगरमधून निवडणूक लढविली होती.
