रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा १७ जुलै रोजी वाढदिवस आहे. या निमित्त रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांसह आपण स्वत: मतदारसंघात उपस्थित राहणारे आहोत असे म्हाडाचे अध्यक्ष आम. उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेते आम. उदय सामंत बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १ हजार ग्रामिण, भागातील मुलांना व्यक्तीमत्व विकासासाठी मुंबईतील पर्सनालिटी डेव्हलपमेंटचे श्री. नेमाळकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता होणार आहे. १० वी, १२ वी नापास झाल्यावर मुले आपण पुढे काही करु शकत नाही असा मनात न्युनगंड बाळगतात. यासाठी रत्नागिरीतील पॉलिटेक्नीकमध्ये फार्मसी कॉलेजात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डिप्लोमा झाल्यावर परदेशात नोकरीसाठी कसं जायचं. परदेशात गेल्यावर तिथे काय करायचं, डिप्लोमा झाल्यावर स्पर्धा परिक्षा कशा द्यायच्या याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘मला चित्रपटात यायचं आहे’ या विषयावर गोगटे कॉलेजमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा राधाबाई शेट्ये सभागृहात दुपारी १२.३० वाजता होणार आहे. या कार्यशाळेला जेष्ट दिग्दर्शक, अभिनेते प्रदीप कबरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद गट स्तरावर १० वी, १२ वी उत्तीर्ण मुलांचा सत्कार करण्यात येणार आहे असे सामंत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे गिरणी कामगारांचा मेळावा होणार आहे. हा मेळावा महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता होणार आहे असे आम. सामंत यांनी सांगितले.
