शृंगारतळी : गुहागर विधानसभा मतदार संघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी गुरुवारी (दि.3) उमेदवारी अर्ज दाखल केला. शृंगारतळीपासून भव्य रॅली काढून जाधव यांनी गुहागर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवारी सकाळी शृंगारतळी जानवळे फाट्यावरील शिवसेना कार्यालयापासून पालपेणे रोडवरच्या भवानी सभागृहापर्यंत भास्कर जाधव यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जि. प. पं. स. सदस्य, सभापती-उपसभापती, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख सचिन बाईत, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा खेतले व गुहागर शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी, गणपत शिगवण, चिपळूण पं. स. उपसभापती शरद शिगवण, अरविंद चव्हाण, जि. प. सदस्य उपस्थित होते. कार्यकर्त्यांसमवेत गुहागर येथे जाऊन भास्कर जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी सुवर्णा जाधव व कुटुंबीय उपस्थित होते.
