कुडाळ : कुडाळमध्ये विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत गुरूवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिवसेना-भाजप-आरपीआय (आ)-रासप महायुतीच्यावतीने उमेदवारी कुडाळ शहरातून भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज कुडाळ निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे दाखल केला. तत्पूर्वी कुडाळ अनंत मुक्ताई समोरील मैदानात झालेल्या जाहीर सभेत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शविली होती. ही उपस्थिती पाहून काही उपस्थितांच्या तोंडून शब्द निघत होते की पूर्वीची शिवसेना अशीच होती. विशेष म्हणजे या भरगच्च सभेतील महिला व पुरूषांच्या डोक्यावर भगवे फेटे व वैभव आमच्या हक्काचा लिहिलेले बाळासाहेब व वैभव नाईक यांचे फोटो असलेलेचे होल्डींग तमाम उपस्थितांच्या हातात दिसत होते. दुसरीकडे मंडपाच्या बाजूला ढोल-ताशाचा गजर सुरूच होता. कुडाळ अनंत मुक्ताई येथील मैदानावर नियोजित सभेसाठी गुरूवारी सकाळी 10 वा. पासून शिवसैनिकांनी गर्दी करण्यास सुरू केली होती. संपूर्ण मंडप भगव्या झेंड्याने लपेटून गेला होता. व्यासपीठावर शिवसेना व भाजपा मित्रपक्षाचे झेंडे लक्षवेधी दिसत होते. सकाळी 11.30 पर्यंत सभामंडप खचाखच भरून गेल्यानंतर 11.45 वा.च्या सुमारास खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, लोकसभा संपर्क प्रमुख आप्पा पराडकर, शिवसेना नेते गौरीशंकर खोत, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश पाटील यांची उपस्थिती होताच ढोल-ताशाचा गजर व तसेच घोषणांनी परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला. उत्स्फूर्तपणे शिवसैनिकांनी सभास्थानी मोठी गर्दी केली होती. ‘वैभव आमच्या हक्काचा हे स्लोगन लिहिलेले व त्यावर बाळासाहेब व वैभवचे फोटो असलेले बोर्ड शिवसैनिकांच्या हातात सभेत होते, ते लक्षवेधी दिसत होते. सुरूवातीलाच खा. विनायक राऊत यांनी आपल्या भाषणास सुरुवात करताच उपस्थित शिवसैनिकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आता आमची लढाई दहशतीशी नाही तर विकासाची आहे. मोठे मताधिक्य दिल्यास तुमच्या आमदाराला मंत्रिपद मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास खा. राऊत यांनी देताच उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. आ. वैभव नाईक यांनी देखील आपण आमदार झालो तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखा तुमच्या सोबत राहत आहे. आज जनतेसमोर ताठ मानेने जात आहे तोही तुमच्या पाठिंब्यामुळेच. सन 2009 साली आपल्यावर जीवघेणा हल्ला झाला त्यावेळी बचावलो म्हणूनच आज मी या ठिकाणी उभा असल्याचे सांगताच सभेत काहीचे वातावरण शांत झाले. तुम्हा सर्वसामान्यांनी मला आपलं मानलं हाच माझा विजय असल्यायचे सांगत आ. नाईक यांनी हीच साथ पुन्हा या निवडणुकीत द्या, असे आवाहन करताच उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे घोषणा देत प्रतिसाद दिला. यावेळी गौरीशंकर खोत, सौ. जान्हवी सावंत, सुरेश पाटील, अतुल बंगे यांनी मनोगत व्यक्त करून आ. नाईक यांना मंत्रिपद मिळायलाच हवं अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्या वाजवुन घोषण देत प्रतिसाद दिला. सभा संपताच त्याच जल्लोषी वातावरणात आ. वैभव नाईक यांची अनंत मुक्ताई गांधी चौक, पोलिस स्टेशन मार्गे कुडाळ तहसील कार्यालयाच्या गेटपर्यंत हजारो शिवसैनिकांची कुडाळ शहरातून लक्षवेधी रॅली निघाली. यावेळी शिवसैनिकांनी भगवे फेटे, झेंडे व बाळासाहेब, उध्दव ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर हातात घेतल्याने शहरात भगवीलाट पसरल्याचे दिसुन येत होते. या रॅलीसाठी शिवसैनिकांनी खास गाडी सजविली होती. या रॅलीच्या गाडीला शिवसेना व भाजपा मित्रपक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. रॅलीत आम. वैभव नाईक,सौ. स्नेहा वैभव नाईक व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी हात उंचावून येणार्या जाणार्या व्यक्तीसह, रस्ता दुतर्फा व्यावसायिकांना आ.नाईक अभिवादन करीत होते. विशेष म्हणजे रस्त्यावरील ये-जा करणार्यांचे मोबाईल हे भगवे वादळ टिपण्यासाठी हात पुढे सरसावत होते. लक्षवेधी रॅली कुडाळ तहसील जवळ पोहचताच आ. वैभव नाईक यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. या सभा व रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे आपल्या फौज फाट्यासह सज्ज होते.
