सामंत-पटवर्धन यांच्या समन्वयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

0

रत्नागिरी : म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत व भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या समन्वयामुळे भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची बंडखोरी झाली नाही. या दोघातील समन्वयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिल्ह्यामध्ये दापोलीतून केदार साठे, चिपळूण-संगमेश्‍वरमधून तुषार खेतल, गुहागरमधून डॉ. विनय नातू यांनी शिवसेना उमेदवारांच्या विरोधात दंड थोपटले. त्याचबरोबर या मतदार संघातील उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरताना भाजप पदाधिकार्‍यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. उत्तर रत्नागिरीमध्ये भाजपमध्ये बंड झालेले असतानाच रत्नागिरीसारख्या भाजपचे प्राबल्य असलेल्या मतदार संघात कोणत्याही प्रकारचे बंड होणार नाही याची काळजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पटवर्धन यांनी घेतली. याचवेळी योग्य टायमिंग साधत म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी भाजप कार्यालयात जाऊन पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. राज्यात अनेक ठिकाणी बंड होत असतानाच, रत्नागिरीत मात्र युती हातात हात घालून एकत्र आली हे सामंत-पटवर्धन यांच्यातील समन्वयामुळे शक्य झाले आहे. राजापूर-लांजा-साखरपा मतदार संघातही भाजपमध्ये नाराजी होऊ नये यासाठी जिल्हाध्यक्षांचे योगदानही महत्त्वाचे ठरले आहे.  राजापूर येथे युतीचे उमेदवार आ. राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप पदाधिकारी उपस्थित होते उत्तर रत्नागिरीमध्ये किरकोळ अपवाद वगळता, भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी नामनिर्देशन पत्र दाखल करताना उपस्थित राहिले नाहीत. जिल्ह्यात पाचही जागांवर शिवसेनेला उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या वाट्याला एकही मतदार संघ न आल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पटवर्धन यांनी जिल्ह्यातील नाराज पदाधिकार्‍यांची नाराजी लवकरच दूर होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला आहे. याचबरोबर शिवसेनेचे उपनेते या नात्याने आ. उदय सामंत हे सुध्दा जिल्ह्यातील भाजपच्या नाराज पदाधिकार्‍यांची समजूत काढणार आहेत. या द्वयींच्या ‘केमिस्ट्री’ने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here