मुंबई : आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आरे जंगलातील २ हजार ७०० झाडे तोडण्याच्या निर्णयाच्या विरोधातील सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. राज्य सरकार आणि एमएमआरसीएलचा विजय झाला आहे. आरे वृक्षतोडी विरोधातल्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्याने आंदोलकांमध्ये प्रचंड निराशेचे वातावरण आहे. बांद्रा-सिप्झ या दरम्यान ३३.५ किमी. लांबीचा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे. या मेट्रोसाठी आरे कॉलनीत कारशेड उभारण्यात येणार आहे. आरेत मेट्रोच्या कारशेडमुळे तेथील गर्द वनसंपदा धोक्यात येईल, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे स्थानिक नागरीक आणि पर्यावरणप्रेमी यांनी वेळोवेळी आंदोलने करून या कारशेडला विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला होता. आता मेट्रोसाठी आरे कॉलनीतील २ हजार ७०० झाडे कापली जाणार आहेत.
