पुणे : जागतिक कुस्ती स्पर्धेतील कांस्य पदक विजेता कुस्तीपटू राहुल आवारे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. राहुल हा आपले प्रशिक्षक आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार यांच्या कन्येशी विवाह करणार आहे. त्याचा ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा ही आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा लाडका मल्ल, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता, पोलिस उपअधिक्षक आणि स्व. रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांचा मल्ल राहुल आवारे लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी पुण्यातील आंबेगाव येथील ऐश्वर्या हॉलमध्ये साखरपुडा होणार आहे. अर्जुनवीर काका पवार यांची कन्या ऐश्वर्या काका पवार हिच्याशी पै. राहुल आवारे याचा विवाह नक्की करण्यात आला आहे. राहुलचे काका पवार हे गुरु आणि प्रशिक्षक आहेत. राहुल याने नुकतेच कझाकिस्तान येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मिळवून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक इतिहास रचला. महाराष्ट्र शासनाने त्याला प्रथम वर्ग नोकरी प्रदान करुन कारकीर्दीचा गौरव यापुर्वीच केला आहे. राहुल सध्या पोलिस उपअधिक्षकाचे प्रशिक्षण घेत असून कुस्तीचाही सराव सुरु आहे.
